बार्शी – जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य करता येते, हे बार्शी तालुक्यातील गुळपोळी गावच्या कन्येने सिद्ध करुन दाखवले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कु. विद्या दत्तात्रय काळे हिची सोलापूर शहर महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. एका सामान्य कुटुंबातील लेकीने खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पूर्ण केल्याने संपूर्ण गुळपोळी गावात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विद्याचा हा संघर्षमय प्रवास आज ग्रामीण भागातील अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, हे विद्याने दाखवून दिले आहे.
विद्याच्या या निवडीबद्दल गुळपोळी ग्रामस्थांकडून तिचे विशेष कौतुक होत असून, शेतीकरी , एका सामान्य कुटुंबातील लेकीने खाकी वर्दी मिळवून गावाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल सर्वत्र अभिमान व्यक्त केला जात आहे. तिच्या या यशाबद्दल महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
















