सोलापूर – भरधाव वेगतील वीट वाहतुक टेम्पो ने समोरून धडक दिल्याने दुचाकी वरील अभियंता तरुण जागीच ठार झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली.
वरून यशवंत खंडागळे ( वय 32 वर्ष , रा. आदित्य नगर सोलापूर ) असे त्या मयत दुचाकी स्वाराचे नाव आहे . आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता मोटारसायकल वरून कंपनीच्या कामानिमित्त श्री सिद्धेश्वर साखर कारखाना मार्गे कुंभारी कडे जात असताना वाटेत चाबुकस्वार वस्ती येथे समोरून येणाऱ्या वीट वाहतुकीच्या टेम्पोने (क्र.एमएच-13 एएन- 4265) त्याला धडक दिली . यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला . ही खबर वळसंग पोलिसांना समजली असता पोलीस हवालदार एस व्ही कुंवर यांनी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह शव विच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात दुपारी बारा वाजता दाखल केला .
दरम्यान अपघात ग्रस्त टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेऊन तो वळसंग पोलीस ठाण्यात लावला आहे .
चौकट – वरूण हा पुण्यातील खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. पुण्यातील ‘एक्वेरियस’ कंपनीच्या एका प्रकल्पाचे काम सोलापुरातील अक्कलकोट रोडवर कुंभारी जवळ सुरू आहे. त्यामुळे वरून गेल्या काही महिन्यापासून या कामासाठी सोलापूरातच आला होता.मयत वरूण खंडागळे हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई , एक भाऊ , एक बहीण असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .
Post Views: 7