सोलापूर – रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्य व कल्याणाप्रती आपली कटिबद्धता कायम राखत, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने १७ एप्रिल २०२६ रोजी भिगवण रेल्वे स्थानकावर एका भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन केले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देणे, रोगांचे लवकर निदान करण्यास प्रोत्साहित करणे आणि रेल्वे समुदायामध्ये निरोगी जीवनशैलीच्या पद्धतींबद्दल जागृती निर्माण करणे, हे या शिबिराचे मुख्य उद्देश होते.
या शिबिरात विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा पुरवण्यात आल्या; यामध्ये सामान्य आरोग्य तपासणी, उंची-वजन व रक्तदाब मोजणी, ईसीजी तपासणी, रक्त नमुने संकलन, क्षयरोग तपासणी आणि मोफत औषध वाटप यांचा समावेश होता. शिबिरादरम्यान अनेक आरोग्यविषयक समस्यांचे निदान झाले, ज्यामुळे संबंधित व्यक्तींना वेळीच वैद्यकीय उपचार आणि पुढील उपचारांची (फॉलो-अप) सुविधा उपलब्ध झाली.
या शिबिरात एकूण १३१ व्यक्तींनी सहभाग नोंदवला; यामध्ये १०१ कर्मचारी आणि ३० कुटुंब सदस्यांचा समावेश होता. रेल्वे परिवाराकडून मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराच्या यशाचे द्योतक ठरला.
या शिबिरात आरोग्य शिक्षण आणि समुपदेशन सत्रांवर विशेष भर देण्यात आला. या सत्रांमध्ये गर्भधारणेपूर्वीचे समुपदेशन, गर्भनिरोधकाच्या तात्पुरत्या व कायमस्वरूपी पद्धती, गर्भाशय मुखाचा व स्तनांचा कर्करोग – प्रतिबंध आणि लवकर निदान, स्तनांची स्वयं-तपासणी तंत्रे, बालकांचे लसीकरण, HPV लसीकरणाबाबत जागृती, ॲनिमिया (रक्तक्षय) प्रतिबंध आणि संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व यांसारख्या विषयांचा समावेश होता.
सोलापूर विभागाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक, डॉ. मंजुनाथ जी. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा चांदक, फिजिशियन डॉ. सतीश बाबू, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. देवीलाल चव्हाण, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. रतन मेकाला आणि डॉ. सूर्य तेजा यांचा समावेश होता.

























