सोलापूर – विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय चर्चांना जन्म दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तीन आमदार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत दिसून आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत देशमुख यांच्यात विधान परिषदेसाठी थेट लढत रंगली असताना ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. माढाचे आमदार अभिजीत पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांची उपस्थिती अनेक राजकीय प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे चार आमदार असताना त्यापैकी तीन आमदार महायुतीच्या बैठकीत दिसल्याने विरोधी गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या उपस्थितीचा अर्थ पक्षांतर असा लावणे घाईचे ठरेल, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विकासकामे आणि भविष्यातील राजकीय समन्वय या दृष्टीनेही अशा बैठकींकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, वसंत देशमुख यांच्या उमेदवारीपासूनच काही नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू होत्या. विशेषतः आमदार उत्तम जानकर यांनी उमेदवारीबाबत व्यक्त केलेली भूमिका आणि त्यानंतरच्या घडामोडी यामुळे या निवडणुकीचे राजकारण अधिकच रंजक बनले आहे. त्यामुळे ही उपस्थिती केवळ शिष्टाचाराचा भाग आहे की भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सध्या तरी बालाजी सरोवरातील या बैठकीने एक संदेश स्पष्ट दिला आहे. सोलापूरच्या राजकारणात विधान परिषद निवडणूक ही केवळ एक निवडणूक नसून आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा राजकारणाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय हालचालींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
मोहिते पाटलांना मोठा धक्का
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे आणि विधान परीषद उमेदवार वसंत देशमुख यांना सोबत घेऊन सोलापूर जिल्हाभर दौरे करत आहेत. पण पहिल्या दिवसापासून आमदार उत्तम जानकर यांनी वसंत देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत उत्तर देताना सांगितले होते, आमच्या घरातला विषय आहे, आम्ही घरात बसून मिटवू. मात्र आमदार उत्तम जानकर यांची मनधरणी करण्यात धैर्यशील मोहिते पाटील यशस्वी झाले नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतर आता सोलापूर विधान परीषद निवडणुकीत महायुतीचा विजय होतो की महाविकास आघाडीचा विजय होतो? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
पवारांचे चार पैकी तीन आमदार भाजप पक्षात प्रवेश करणार का?
पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते, शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार ज्योती वाघमारे यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील तीन आमदार महायुतीच्या बैठकीला आले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढाचे आमदार अभिजीत पाटील, करमाळाचे आमदार नारायण पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर या तीन आमदारांची महायुतीच्या बैठकीला उपस्थिती होती. विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत बैठकीला चालत आले. विधान परिषद निवडणुकी अगोदर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तीन आमदार भाजप प्रवेश करणार आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात आहेत