बार्शी – मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत बार्शी तालुक्यातील शिबिराचे उद्घाटन संत तुकाराम सभागृह, शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान व्हावा तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बार्शी शहर व तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले.
या शिबिरामध्ये एका छताखाली तब्बल २३ शासकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जात, उत्पन्न व रहिवासी दाखले, आधार नोंदणी व दुरुस्ती, दिव्यांग प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड दुरुस्ती यासह विविध महसुली व कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.
कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात लाभांशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, ‘शासन आपल्या दारी आणि सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हेच या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट आहे. विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष लाभ एकाच ठिकाणी मिळणे हेच या अभियानाचे खरे यश आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या प्रत्येक अर्जाचा तातडीने निपटारा करावा.’
कार्यक्रमास सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनीताई कथले, पंचायत समिती सभापती सौ. मिनाक्षीताई रोंगे, उपसभापती संतोषदादा निंबाळकर, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष ॲड. रणवीर राजेंद्र राऊत, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, प्रशांत कथले, तहसीलदार एफ. आर. शेख, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, बाजार समितीचे उपसभापती बाबा गायकवाड, संचालक गजेंद्र मुकटे, माजी सरपंच दीपक रोंगे, श्रीमंत थोरात, पंचायत समिती सदस्य किरण घुले, बँक व्यवस्थापक राहुल खुने, वालचंद मुंडे, राजाभाऊ सुरवसे, मदन गव्हाणे, समर्थ तुपे, संदीप मिरगणे, जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार काळे, पंचायत समिती सदस्य भिमा गव्हाणे, तुळशीदास मस्के, विनायक घोडके, महेश बोधले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या कमी होऊन आवश्यक सेवा सुलभ व जलद पद्धतीने उपलब्ध होणार असल्याने बार्शी तालुक्यात या शिबिराचे स्वागत होत आहे.
Post Views: 6