सोलापूर – लोकसहभाग, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाविषयीची तळमळ यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला भेट द्यावी लागेल. ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि विविध दात्यांच्या सहकार्यामुळे या शाळेचा अक्षरशः कायापालट झाला असून आज ही शाळा आधुनिक, आकर्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ज्ञानमंदिर बनली आहे.
शाळेच्या परिसरात प्रवेश करताच रंगीबेरंगी आणि आकर्षक प्रवेशद्वार प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. संपूर्ण शाळेच्या भिंतींवर विविध शैक्षणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण विषयक चित्रे साकारण्यात आली आहेत. प्रतापगड, भारतीय संविधान, भारताचा नकाशा, महाराष्ट्राचा नकाशा, जगाचा नकाशा, राष्ट्रीय प्रतीके, वन्यजीव, पक्षी, फुलपाखरे, समुद्री जीवसृष्टी, संगीत वाद्ये तसेच निसर्गरम्य दृश्ये अशा अनेक विषयांवरील चित्रांमुळे शाळेच्या भिंती अक्षरशः बोलक्या झाल्या आहेत.
विशेष म्हणजे थ्री-डी शैलीतील रंगकामामुळे विद्यार्थ्यांना शिकणे अधिक रंजक आणि आनंददायी होत आहे. वर्गखोल्यांना विविध ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आपुलकी निर्माण होत आहे. शाळेतील प्रत्येक भिंत विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासक्रम बनली असून शिक्षणासोबतच संस्कार आणि प्रेरणा देण्याचे कार्य करत आहे.
या परिवर्तनामागे लोकसहभागाची मोठी ताकद उभी आहे. सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी शाळेला भेट दिल्यानंतर लोकसहभागातून शाळा समृद्ध करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी स्वतः पुढाकार घेत पुण्यातील एका कंपनीच्या सीएसआर निधीतून सुमारे साडेआठ लाख रुपयांची मदत उपलब्ध करून दिली. या निधीतून शाळेतील प्रत्येक वर्गखोलीसाठी एलईडी टीव्ही, स्मार्ट बोर्ड, संगणक, टेबल-खुर्च्या, साऊंड सिस्टीम आणि इतर आधुनिक शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
शाळेच्या विकासात स्थानिक उद्योजकांनीही मोलाचे योगदान दिले आहे. इंगळगी येथील उद्योजक किशोर माळी यांनी शाळेसाठी १ लाख ५१ हजार रुपयांची मदत देऊन सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. तसेच उद्योजक शिवानंद हत्तुरे यांनीही १ लाख रुपयांची आर्थिक मदत करून शाळेच्या विकासात हातभार लावला. याशिवाय गावातील अनेक दानशूर व्यक्ती, पालक आणि ग्रामस्थांनीही विविध स्वरूपात योगदान देत शाळेला नवे रूप देण्यासाठी सहकार्य केले आहे.
सुशोभित परिसर, आकर्षक बगीचा, स्वच्छ वातावरण, शैक्षणिक चित्रांनी सजलेल्या भिंती आणि डिजिटल सुविधांनी युक्त वर्गखोल्या यामुळे इंगळगीची जिल्हा परिषद शाळा आता ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श मॉडेल म्हणून उदयास येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणाची निर्मिती येथे करण्यात आली आहे.
लोकसहभागातून घडलेल्या या परिवर्तनामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण झाला आहे. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र आल्यास सरकारी शाळाही खासगी शाळांच्या तोडीस तोड उभ्या राहू शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे इंगळगीची ही जिल्हा परिषद शाळा होय.
Post Views: 29