सोलापूर – मंद्रूप ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच असताना व सहा वाॅर्डामधून निवडून आलेल्या नऊ महिला सदस्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे दिसून येत आहे . महिला सरपंचांच्या उपस्थित महिला सदस्यांचे पती व पुत्र ग्रामपंचायत कारभारामध्ये हस्तक्षेप करीत असल्यामुळे नागरिकांमधून टीका होत आहे . महिला सरपंच असताना सर्व महिला सदस्यांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी निर्णय घेणे अपेक्षित आहे . मात्र महिला सदस्यांची पती व त्यांचे पुत्र कारभार करीत असल्यामुळे वाॅर्डाच्या विकास कामावर परीणाम होत आहे . त्यामुळे वरिष्ठ अधिकारी व पॅनलप्रमुखांनी महिला सदस्यांना ‘अॅक्टिव्ह’ करून पती व पुत्रांचे हस्तक्षेप थांबविण्याची मागणी करण्यात येत आहे.
एकीकडे महिला सशक्तिकरणासाठी व त्यांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार कायदा करीत आहे. मात्र मंद्रूप ग्रामपंचायतमध्ये निम्याहून अधिक ग्रामपंचायत सदस्य महिला असताना ग्रामपंचायत कारभारात त्यांचा सहभाग दिसून येत नाही. दुसरीकडे ग्रामपंचायत महिला सदस्यांचे पती व त्यांचे पुत्र ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करताना दिसून येत आहे. त्यामुळे वाॅर्डाच्या विकास कामात व्यत्यय येत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. पती व पुत्र यांच्याकडून मनमानी कारभार करून विकासाला खीळ बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक वाॅर्डात विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचीही नागरिकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी व पॅनल प्रमुखांनी महिला सदस्यांना ग्रामपंचायत कारभारात सहभागी होण्यासाठी परावृत्त करणे गरजेचे आहे. तर ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या पती व पुत्रांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
….
सदस्य पती व पुत्रांकडून ठेकेदारी सुरु
…
मंद्रूपमधील अनेक वाॅर्डात महिला सदस्यांचे पती व त्यांचे पुत्र यांच्याकडून विकासाच्या नावाखाली ठेकेदारी सुरू आहे. अधिकार्यांना ‘मॅनेज’ करून विकासकामांचे बिल काढण्यासाठी खटाटोप सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांना खुष ठेवण्यासाठी पॅनलप्रमुख महिला सदस्यांच्या अनुपस्थितीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा सुरू आहे.
….
तर नागरीकांना बंदी का ?
….
मंद्रूप ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच कामकाज करीत असताना महिला सदस्य अॅक्टीव्ह असणे गरजेचे आहे. त्यांचे पती व पुत्र कारभारात हस्तक्षेप करणे नियमबाह्य आहे . महिला सदस्यांच्या पती व पुत्रांना मासिक बैठकीसह इतर निर्णय प्रक्रीयेमध्ये सहभागी करून घेता . तर नागरीकांना मासिक बैठकीत व निर्णयाप्रक्रीयेत बंदी का आणता ? महिला सदस्यांचे पती व पुत्रही नागरीकच आहेत. यामुळे मंद्रूपमध्ये महिला ग्रामपंचायत सदस्यांना दुय्यम वागणूक मिळत आहे.
श्रीमंत पवार, नागरीक सेवालाल नगर, मंद्रूप
….

























