बार्शी – जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथे नर्सरी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पहिली पालक सभा उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालक यांच्यातील सुसंवाद, विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित या सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सभेच्या प्रारंभी उपस्थित पालकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नर्सरी ते बारावीपर्यंतच्या सर्व विभागप्रमुख यांनी आपल्या विभागाचे शैक्षणिक नियोजन, अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिस्त, स्पर्धा परीक्षा, फाउंडेशन कोर्स, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, डिजिटल शिक्षण, इंग्रजी संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या यशात पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याविषयी मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांच्या धर्तीवर या सभेमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन, उपस्थिती व शिस्त, सुरक्षित प्रवास, बोर्डिंगमधील दिनचर्या, अभ्यासाचे नियोजन, डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर, जीवनकौशल्ये, संवादकौशल्य, मानसिक आरोग्य, करिअर मार्गदर्शन, पालक-शाळा संवाद व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गुणवत्तेचा विकास आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयारी या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी शालेय समितीची निवड करण्यात आली नवनिर्वाचित समितीचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष संभाजी घाडगे, सचिवा वर्षा घाडगे, प्र. अ. किशोर कदम, फिजिकलं कोच जे. बी. शिंदे मेजर व जिजाऊ गुरुकुल परिवारातर्फे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सभेत जिजाऊ गुरुकुलचे ध्येय केवळ गुणवंत विद्यार्थी घडविणे नसून, सुसंस्कृत, जबाबदार, आत्मविश्वासू आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडविणे हे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शाळा आणि पालक यांच्या सशक्त भागीदारीतूनच विद्यार्थ्यांच्या यशाचा भक्कम पाया रचला जातो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Post Views: 13