सोलापूर : गेली ६६ वर्षे समाजातील तळागाळातील घटकांसाठी विविध सेवाभावी उपक्रम राबविणाऱ्या लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा सन २०२६–२७ या वर्षाचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात बंगळूर येथील लायन्सचे माजी प्रांतपाल लायन विजयकुमार शेट्टी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली.
यावेळी बोलताना लायन विजयकुमार शेट्टी यांनी, “लायन्स क्लब ऑफ सोलापूरचे समाजसेवेतील सातत्यपूर्ण कार्य आदर्शवत असून, भविष्यातही अशाच सेवाभावी उपक्रमांद्वारे समाजाला दिशा मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान प्रांतपाल लायन राजेंद्र शहा कांसवा होते. व्यासपीठावर माजी प्रांतपाल लायन प्रबुद्धचंद्र झपके, लायन अशोक मेहता, रिजन चेअरमन लायन महेश नळे, झोन चेअरमन लायन अमिता कारंडे, प्रांतीय मुख्यालय प्रमुख लायन दिनेश बिराजदार, प्रांतीय सचिव लायन रमेश जैन, प्रांतीय कोषाध्यक्ष लायन सुरेश जाजू तसेच लिओचे माजी अध्यक्ष लिओ सौरभ मालू यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मावळत्या अध्यक्षा लायन नंदा लाहोटी यांनी स्वागत केले, तर मावळत्या सचिवा लायन राधिका सोनी यांनी वर्षभरातील सेवाकार्याचा आढावा सादर केला. माजी प्रांतपाल लायन प्रबुद्धचंद्र झपके यांनी नव्या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली व लायन्स चळवळीच्या जागतिक कार्याचा परिचय करून दिला.
यावेळी माजी अध्यक्ष कै. संजय कोरे यांच्या स्मरणार्थ दोन विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्याचा धनादेश ला. सुश्मिता कोरे व ला. धनराज कोरेपाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच ला. यश खेड यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रमजीनगर येथे स्मार्ट टी.व्ही. भेट देण्यात आला.
नूतन अध्यक्ष लायन मंजुनाथ दर्गोपाटील यांनी आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचा संकल्प मांडला. लिओ क्लबचे अध्यक्ष लिओ उज्वल सावळगी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी प्रांतपाल, विविध लायन्स क्लबचे पदाधिकारी, लायन व लिओ सदस्य, दर्गोपाटील परिवारातील सदस्य तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन अकबर मुल्ला व लायन संज्योती बिराजदार यांनी केले, तर सचिव लायन विकास पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
Post Views: 17