पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी फडवणीस सरकार विरोधात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी (ता.२६) महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी होणार आहे,अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.
सरकार विरोधात काढण्यात येणार्या मोर्चाच्या नियोजनासाठी गुरुवारी (ता.२४) पंढरपुरात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक झाली. त्यानंतर आमदार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
आमदार पाटील म्हणाले, यावर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची गडद छाया आहे. पावसा अभावी खरिप पिके जळून गेली आहेत. तर उसाची वाढ खुंटली आहे. जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तरीही सरकारचे दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष आहे. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना मदत करावी या मागणीसाठी शनिवार येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सरकार विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह सर्व आमदार आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत. मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. सरकारने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आता पर्यंत कुठलीही भरीव अशी मदत दिली नाही. मागील महिन्यातच सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना मदत द्यायाला पाहिजे होती. परंतु सरकारने शेतकर्यांना वार्यावर सोडल्याची टिकाही आमदार पाटील यांनी केली. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, शेतकर्यांना सरसकट दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, चारा छावण्या सुरु कराव्यात आदी प्रमुख माण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार असून शेतकर्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा अध्यक्ष वसंतराव देशमुख,संजय पाटील घाटणेकर,दीपक वादेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते.
Post Views: 12