– महायुती २३४, मविआ ५०
– विरोधकांच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या वल्गना फोल
मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात जवळपास २३४ जागा मिळवत महायुतीला एकतर्फी विजय झाला आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी स्पष्ट बहुमताचा आकडा मिळाल्याने शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोमवारी, २५ तारखेला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केवळ महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महायुतीला २३४ जागांवर आघाडीवर मिळाली आहे. यात भारतीय जनता पक्ष (भाजप) १३२, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ५७, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा (मविआ) वारू अवघ्या ५० जागांवर रोखण्यात महायुतीला विशेषत: भाजपला यश आले आहे. यामध्ये काँग्रेस १६, शिवसेना (उबाठा) २० आणि राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत. याशिवाय चार जागांवर अपक्ष किंवा इतर उमेदवार निवडून आले आहेत. मात्र मनसेला एकही जागा निवडून आणता आली नाही.