अक्कलकोट – शारीरिक दिव्यांगत्वावर मात करत आणि संकटांना संधीत रूपांतरित करत, तोळणूर येथील श्री सिद्धरामेश्वर उच्च माध्यमिक प्रशालेचा विद्यार्थी आणि प्रसिद्ध गायक रेवणसिद्ध पुंडलिक फुलारी याने बारावीच्या परीक्षेत ५६.३३% गुण मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. झी कन्नड ‘सारेगमप’ या सुप्रसिद्ध सिंगिंग रियालिटी शोमध्ये टॉप फोरपर्यंत मजल मारणाऱ्या रेवणसिद्धने शिक्षणातही आपली चमक कायम ठेवली असून, सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेली यंदाची परीक्षा अत्यंत कडक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडली. या आव्हानात्मक परिस्थितीत रेवणसिद्धने लेखनिकाच्या साहाय्याने परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे, या शाळेतील परीक्षेला बसलेल्या ३० विद्यार्थ्यांपैकी केवळ ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यात रेवणसिद्धने स्थान मिळवून आपली अभ्यासातील जिद्द सिद्ध केली आहे. यापूर्वी त्याने दहावीच्या परीक्षेतही ८८% गुण मिळवून यश मिळवले होते.
**मोठ्या अधिकारी होण्याचे स्वप्न**
आपल्या यशाबद्दल बोलताना रेवणसिद्ध म्हणाला, “बारावी उत्तीर्ण होण्याचे महत्त्व मला या निकालावरून समजले आहे. माझ्या कुटुंबाने आणि शिक्षकांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. माझे स्वप्न एक मोठा अधिकारी होण्याबरोबर देशातील सुप्रसिद्ध गायक होणार असून, त्यासाठी मी माझे शिक्षण आणि संगीत शिक्षण अखंडित सुरू ठेवणार आहे. माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या गुरुजनांना आणि लेखनिक म्हणून मदत करणाऱ्या प्रसाद रामतीर्थ याला देतो.”
रेवणसिद्धला वर्गशिक्षक वैभव पोतदार, रेणुकाचार्य हिरेमठ, रेवणसिद्ध मणूरे, शिवानंद करजगी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशालेचे प्राचार्य सुशीलकुमार गायकवाड, प्रकाश अतनुरे, हमीद नदाफ, काशिनाथ चलगेरी, माणकोजी मॅडम,पवार सर,यशवंत हरळय्या सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. एका दिव्यांग कलाकाराने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेल्या या यशाचे परिसरात कौतुक होत आहे.


























