सोलापूर – सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी मैदानात उतरलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शहरातील जिल्हा परिषद संचलित वसतीगृहांना अचानक भेट देत सुविधांची सखोल पाहणी केली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्याने वसतीगृहात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेमार्फत सोलापूर शहरात दोन प्रमुख वसतीगृहे चालवली जातात. शेळगी येथील मुलींचे वसतीगृह आणि पार्क चौक परिसरातील मुलांचे नेहरू वसतीगृह या दोन्ही ठिकाणी सीईओ जैन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी राहण्याची व्यवस्था, स्वच्छता, भोजनाची गुणवत्ता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच इतर मूलभूत सुविधांची त्यांनी बारकाईने तपासणी केली.
या पाहणीदरम्यान जैन यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या दैनंदिन अडचणी, शैक्षणिक गरजा तसेच वसतीगृहातील काही उणिवा स्पष्टपणे मांडल्या. काहींनी भोजनाच्या दर्जाबाबत सुधारणा, तर काहींनी अभ्यासासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सूचनेची दखल घेत जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक त्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
तसेच वसतीगृह अधीक्षकांना स्वच्छता, सुरक्षितता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सीईओंच्या या अचानक पाहणीमुळे वसतीगृह प्रशासनात चांगलीच हालचाल निर्माण झाली असून व्यवस्थापन अधिक सजग झाल्याचे चित्र दिसून आले.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनीही या भेटीचे स्वागत करत आपल्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचल्याबद्दल समाधान व्यक्त केले. एकंदरीतच, विद्यार्थ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही पुढाकाराची भूमिका महत्त्वाची ठरत असून, आगामी काळात वसतीगृहांच्या सुविधांमध्ये अधिक सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.

























