सोलापूर – पुणे येथील तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार सोलापूरचे लेखक अनिल पाटील यांच्या ‘काही जनातले काही मनातले’ या साहित्यकृतीला प्रदान करण्यात आला. पुण्याच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ येथील वि. का. राजवाडे सभागृहात हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या राज्यस्तरीय ग्रंथ स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण १५६ पुस्तके प्राप्त झाली होती. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेतून ५६ विविध गटांतील पुस्तकांची निवड ‘सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारा’साठी करण्यात आली. यामध्ये अनिल पाटील यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘काही जनातले काही मनातले’ या पुस्तकाने मान्यवरांची पसंती मिळवत आपले स्थान निश्चित केले.
तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत आयोजित या वितरण सोहळ्याला संस्थेच्या संस्थापिका श्रीमती प्रिया प्रमोद दामले, सुजित दातार, योगेश सुपेकर, सुभाष सोनवणे आणि डॉ. राजेश्वर हेंद्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अनिल पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना अनिल पाटील यांनी ‘तितिक्षा’ संस्थेच्या पारदर्शक आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “स्पर्धेचे नोटिफिकेशन, पुस्तके स्वीकारण्याची मुदत, निकालाची घोषणा आणि प्रत्यक्ष सोहळ्याची तारीख या सर्व गोष्टी संस्थेने आधीच जाहीर केल्या होत्या. ज्याप्रमाणे नियोजन केले, अगदी तंतोतंत त्याच वेळेत आणि शिस्तीत हा कार्यक्रम पार पडला, हे कौतुकास्पद आहे.”
सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विविध उपक्रमांनी रंगत गेला. कार्यक्रमाची सुरुवात चहा-नाश्त्याने झाली, त्यानंतर ग्रंथ प्रकाशन, काव्य स्पर्धा आणि मुख्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सुटसुटीत आणि नेटके नियोजन असलेल्या या कार्यक्रमाची सांगता करताना संस्थेच्या सर्वेसर्वा श्रीमती प्रिया दामले यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. तितिक्षा परिवार राबवत असलेल्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती देत त्यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.


























