सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे गुरुवारी श्री शिवचरित्राचे सामूहिक पारायण करण्यात आले. रंगभवन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानात हा उपक्रम झाला.
प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी मूर्ती परिसराची फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती.
सामूहिक प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी श्री शिवसुर्यहृदय सामूहिकरीत्या म्हणण्यात आले. यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी राजा शिवछत्रपती या श्री शिवचरित्र ग्रंथाचे सामूहिक पारायण केले. ध्येयमंत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















