सोलापूर : वाढत्या महागाईच्या काळात विवाहाचा वाढता खर्च सर्वसामान्य कुटुंबांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. ही बाब लक्षात घेऊन व्हिक्टर युथ असोसिएशन इज्तेमाई शादी कमिटी, सोलापूरच्या वतीने यंदा मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष इम्तियाज कमिशनर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा विवाह सोहळा रविवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पानगल हायस्कूल, सिद्धेश्वर पेठ येथे होणार आहे. विवाह सोहळ्याचे हे २५ वे वर्ष आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह इच्छुक जोडप्यांचे विवाह इस्लामिक पद्धतीने (शरीयतनुसार) कमी खर्चात पार पाडण्यात येणार आहेत. विवाहासाठी काझी तसेच फुलपानाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. वर आणि वधू पक्षाकडून येणाऱ्या प्रत्येकी १०० पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
नवदाम्पत्यांना विविध संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. वराचे वय २१ वर्षे आणि वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नावनोंदणीसाठी जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी बेगमपेठ, विजापूर वेसजवळील फेमस हॉटेल परिसरातील कार्यालय. बख्तियार सय्यद – ९५६१०५५५९४, कय्युम शेख – ९७६६३०१७६० येथे संपर्क साधावा, असे आवाहन इज्तेमाई शादी कमिटीच्या वतीने करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस शोएब चौधरी, बख्तियार सय्यद, अशपाक कल्याणी, रफिक कोसकी आदी उपस्थित होते.
Post Views: 18