सोलापूर : प्रसूतिगृहातील रात्रपाळी, अचानक आलेली प्रसूती आणि आईच्या चेहऱ्यावरची चिंता… अशा अनेक संवेदनशील क्षणांची साक्षीदार होत सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी तब्बल ३१ वर्षे रुग्णसेवा केली. ७ ऑगस्ट १९९५ रोजी मिडवाईफ म्हणून सुरू झालेला त्यांचा सेवाप्रवास आज मेट्रन पदापर्यंत पोहोचला आहे. असंख्य माता आणि नवजात बालकांची सेवा करत त्यांनी कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण केला.
संगीता लेकुरवाळे, संगीता गुरव, अर्चना शेलार, सुनिता सावंत आणि ज्योती कांबळे यांनी ७ ऑगस्ट १९९५ रोजी मिडवाईफ म्हणून सेवेला सुरुवात केली. राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह, डफरीन चौक येथील प्रसूतिगृह, भावनाऋषी प्रसूतिगृह, रामवाडी आणि जिजामाता प्रसूतिगृह यांसह महापालिकेच्या विविध आरोग्य संस्थांमध्ये त्यांनी सेवा बजावली. प्रसूतीपूर्व काळजी, प्रसूतीच्या वेळी आवश्यक सहकार्य तसेच प्रसूतीनंतर माता व नवजात बालकांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. रात्री-अपरात्री, सण-उत्सव अथवा सुट्टीचा दिवस असला तरी रुग्णसेवेला प्राधान्य देत त्यांनी आपले कर्तव्य बजावले. अनेक कुटुंबांसाठी त्यांच्या सेवेमुळे प्रसूतीचा कठीण काळ अधिक सुरक्षित आणि दिलासादायक ठरला.
अनुभव, मेहनत आणि सातत्यपूर्ण सेवेमुळे त्यांनी मेट्रन पदापर्यंत मजल मारली. सध्या प्रसूतिगृहाचे दैनंदिन व्यवस्थापन, कर्मचारी नियोजन, रुग्णसेवेचे नियोजन, स्वच्छता व शिस्त तसेच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमधील समन्वयाची जबाबदारी त्या सांभाळत आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील या महिला कर्मचाऱ्यांचा सेवाप्रवास कर्तव्यनिष्ठा, सेवाभाव आणि रुग्णांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
असंख्य माता आणि नवजात बालकांची
सेवा करण्याची संधी मिळाली
३१ वर्षांचा हा प्रवास आमच्यासाठी केवळ नोकरीचा कालावधी नसून समाजसेवेचा प्रवास आहे. असंख्य माता आणि नवजात बालकांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमच्यासाठी सर्वांत मोठे समाधान आहे. सहकारी, डॉक्टर आणि महापालिका प्रशासनाच्या सहकार्यामुळे मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा प्रवास शक्य झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
—–
Post Views: 20