बार्शी – शहरातील राऊळ गल्ली परिसरात सोमवार दि. २२ जून रोजी दुपारी एका दोन मजली निवासी इमारतीला भीषण आग लागून जुन्या सागवानी लाकडाच्या माळवदासह संपूर्ण दुसऱ्या मजल्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील संसारोपयोगी साहित्य, फर्निचर आणि घराचे मिळून अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राऊळ गल्ली येथील तांबोळी कुटुंबीयांच्या मालकीच्या या इमारतीत मजहर तांबोळी, जहीर तांबोळी आणि जुबेर तांबोळी हे आपल्या आई, पत्नी आणि मुलांसह संयुक्त कुटुंब पद्धतीने वास्तव्यास आहेत. दुपारी तीनच्या सुमारास इमारतीच्या वरच्या भागातून धूर आणि ज्वाळा दिसू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तांबोळी कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या मजल्याच्या वरच्या भागावर पडलेल्या फटाक्यांच्या ठिणगीमुळे आग लागली. इमारतीतील माळवद हे जुन्या सागवानी लाकडाचे असल्याने आगीने काही क्षणांतच मोठा पेट घेतला.
आग लागल्याचे लक्षात येताच घरातील महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आग वाढत असल्याचे दिसताच बार्शी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या तब्बल सात गाड्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
दरम्यान, परिसरातील मौला मुलाणी,जाकीर चौधरी, वसीम तांबोळी, एजाज तांबोळी, डॉ. जीशान मुलाणी, इरफान तांबोळी तसेच अन्य युवकांनी प्रसंगावधान राखत घरातील महिला व मुलांना बाहेर काढण्यास मदत केली. याशिवाय घरातील गॅस सिलिंडर सुरक्षित बाहेर काढून संभाव्य मोठा स्फोट टाळला. तसेच आग इतर घरांमध्ये पसरू नये यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले.
या आगीत दुसऱ्या मजल्यावरील सर्व खोल्यांमधील कपाटे, बेड, गाद्या, कपडे, शालेय दप्तरांसह मोठ्या प्रमाणातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सागवानी लाकडाचे माळवद जळून त्याचे कोळशात रूपांतर झाले आहे. काही खोल्यांवरील पत्रेही जळाल्याने दुसरा मजला पूर्णपणे उघड्यावर पडला आहे. तसेच खालच्या मजल्यावरील स्वयंपाकघर व इतर खोल्यांमधील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी संसार उभा करण्यासाठी वर्षानुवर्षे जमविलेले साहित्य आगीत भस्मसात झाल्याने तांबोळी कुटुंबीय अक्षरशः हतबल झाले होते. डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यावर दुःखाचे भाव घेऊन उभ्या असलेल्या कुटुंबीयांना पाहून परिसरातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली.
Post Views: 9