सांगोला – सांगोला तालुक्यातील टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनांच्या विविध मागण्या व पाण्याच्या प्रश्नांबाबत आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी बुधवार दि.७ सप्टेंबर रोजी सिंचन भवन, कोल्हापूर येथे मुख्य अभियंता अलका अहिरराव आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत पाण्याचे सर्व प्रश्न सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी पं.स.सदस्य मुकेश काशीद व सोनंद-गळवेवाडी भागातील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी टेंभू व म्हैसाळ योजनांमधून पाणी उपलब्ध न होण्याच्या समस्या, सिंचनातील अडचणी आणि संबंधित मागण्या मांडल्या. आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या या अडचणींना आवाज देत अधिकाऱ्यांकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. अलका अहिरराव यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत लवकरात लवकर पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. उपस्थित शेतकऱ्यांनी या बैठकीबद्दल समाधान व्यक्त करत लवकरच पाणी उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली.
चौकट-
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. टेंभू आणि म्हैसाळ योजनांमधील अडचणी दूर करून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत.
-आ.डॉ.बाबासाहेब देशमुख