बार्शी – शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य एमआयटी समूहाच्यावतीने बार्शी येथे नवीन डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यात आले असून, या महाविद्यालयास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली यांची मान्यता प्राप्त झाली आहे. या मान्यतेमुळे बार्शी व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत.
एमआयटी समूहाच्या शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभलेल्या या नव्या डिप्लोमा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक वर्ग, उद्योगाभिमुख शिक्षण तसेच कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षणासह उच्च शिक्षणाच्या संधीही प्राप्त होणार आहेत.
महाविद्यालयामध्ये पदविका अभियांत्रिकी शाखांमध्ये सिव्हील, मेकॅनिकल, कॉम्पुटर सायंन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलीकम्युनिकेशनसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे. एमआयटी समूहाच्या विद्यमान अभियांत्रिकी संस्थांनी शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, उद्योग सहकार्य व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
या नव्या डिप्लोमा महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे बार्शी तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये न जाता स्थानिक स्तरावर गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण उपलब्ध होणार आहे. तसेच परिसरातील औद्योगिक व तांत्रिक विकासालाही चालना मिळणार असल्याचा विश्वास संस्थेच्या संचालिका प्रा. स्वाती चाटे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी AICTE मान्यता मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
Post Views: 8