पंढरपूर – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांना झटपट आणि सुलभ दर्शन मिळावे, याकरिता १५ जुलैपासून व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या नव्या नियमाचा फटका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे मात्र लवाजम्यासह दर्शन घेऊन गेल्याने व्हीआयपी दर्शन बंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाल्याचं चित्र बघायला मिळाले.
दरम्यान याच व्हीआयपी दर्शनाबाबत आता प्रशासन ॲक्टिव मोडवर आले आहे. व्हीआयपी दर्शन घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आपत्कालीन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेएन यांनी दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनानंतर व्हीआयपी दर्शन बंदीची कठोरपणे अंमलबजावणी प्रोटोकॉल नुसार राज्यातील मंत्री, आमदार, खासदार यांना व्हीआयपी दर्शन घेता येईल. मात्र यावेळी त्यांच्यासोबत दोन किंवा तीन लोकांनाच दर्शनासाठी सोडले जाणार आहे. मंत्री आणि आमदारांच्या सोबत असणारा लवाजमा मंदिरात सोडला जाणार नसल्याचा खुलासाही जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनानंतर पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंदी बुधवार (१५ जुलै) पासून लागू करण्यात आली. बुधवारी पहिल्या दिवशी थोडा गोंधळ झाल्याची कबुली देताना जिल्हाधिकाऱ्यांनी आता यापुढे अतिशय कठोरपणे व्हीआयपी दर्शन बंदीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले.
———————
चौकट : ( वाखरीतील मुख्य पुलाला धोका झालेला नाही )
दरम्यान, बुधवारी (१५ जुलै) पहिल्याच पावसात वाखरी येथील नवीन पुलाचा भराव खचला होता. याशिवाय पालखीतळाच्या परिसरात मोठे पाणी जमले होते. याबाबत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्य पुलाला कोणताही धोका झाला नसून बाजूचा भराव आता दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्याच पावसात वाखरी पालखीतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्या बद्दल बोलताना ही कामे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून झाली असून आता पाण्याचा निचरा करण्यासाठी येथे तातडीने नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
या बरोबरच वारकऱ्यांच्या आगमनापूर्वी पाऊस सुरू झाला असून सोलापूर जिल्ह्याला पावसाची खूप गरज होती, असे सांगत पाऊस सुरू झाल्याने अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास देखील जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी यावेळी व्यक्त केला.
Post Views: 7