पंढरपूर – कार्तिकी वारीचे वेगळे आकर्षण असलेला वाखरी पालखी तळावर जनावरांचा बाजार सर्व प्रकारच्या जनावरांनी भरला असून हजारो शेतकऱ्यांची लाडकी जनावरे पाणी, हिरवा चारा, कडबा यांच्याअभावी विक्रीस आली आहेत. विशेष म्हणजे जनावरांचा बाजार यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे भरगच्च भरल्याचे दिसुन येत आहे. सुमारे दीड ते दोन हजारांहून अधिक लहानमोठी जनावरे या बाजारात असल्याचे सांगितले जात आहे. खिलार जनावरे आणि पंढरपूर म्हशीला या बाजारात जास्तीची मागणी अससल्याचे बोलले जात आहे.
पंढरपूरची कार्तिकी यात्रा म्हटले की, खिलार जनावरे खरेदी-विक्रीसाठी अगदी नावाजलेली यात्रा आहे. सांगोला, माळशिरस, इंदापूर, पंढरपूर, माढा, मोहोळ, तसेच सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून या भागात आपली पाळीव जनावरे घेऊन शेतकरी खरेदी-विक्रीसाठी येतात. १५ नोव्हेंबरपासून चालू झालेली ही कार्तिकी यात्रा दुष्काळामुळे कमी प्रमाणात भरली आहे. दरम्यान याच दुष्काळामुळे चारा-पाण्याचा प्रश्न उद्भवला असल्याने पशुपालकांनी जनावरे बाजारात विक्रीकरिता दाखल केली आहे. परंतु, दर पडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
बाजारात दहा हजारापासून ते दोन लाख रुपयांपर्यंत जनावरे खरेदी-विक्री केली जात आहे. यामध्ये देशी गाय, खिल्लार खोंड, बैल तसेच वळू बैल यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र यावर्षी दुष्काळाचे सावट पाहता यावर्षी दर गडाडले असून याचा फटका जनावरांच्या बाजारात जास्त प्रमाणात जाणवत आहे.
शर्यतीसाठी खरेदी केली जाणारी खोंडे यांना मागणी जास्त प्रमाणात असून कमी दरात मागणी होत असल्याने शेतकरी वर्गाच्या खिशाला चाट बसत आहे. खिल्लार खोंड खरेदीसाठी कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग येत आहे. पंढरपूर कार्तिकी यात्रेनंतर, खरसुंडी, पिलीव, पुसेगाव, या भागातील यात्रेवर आता परिणाम झाला आहे.
पावसामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने ग्राहक कमी दरात जनावरे खरेदी करु पहात आहेत. चार ते सहा महिन्यांचे खिल्लार जातिवंत खोंडाला ३० ते ४० हजार अपेक्षित असताना २० ते २५ हजार रुपये मिळत आहे. कडाक्याच्या थंडीत सात ते आठ दिवस जनावरांच्या सोबत येऊन मनासारखा दाम न मिळाल्याने शेतकरी मनातून दुखावला जात आहे.
दरम्यान येणाऱ्या कालावधीत वैरणीचे दर कडाडले तर जनावरे सांभाळणे कठीण होणार आहे. काही शेतकरी अपेक्षा जास्त न ठेवता कमी आर्थिक व्यवहारात नाईलाजाने जनावरे देतात.
—————–
चौकट : ( कवडीमोल किंमतीला खरेदी विक्री )
कार्तिकी यात्रेत अनेक पशुप्रेमी, दुग्ध उत्पादक शेतकरी येतात. पण यावर्षी अनेकांनी नाईलाजाने जनावरे विक्रीस आणली असून लाडकी गाय, म्हैस, गोंडस वासरू विकताना अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. जिवापाड जपलेली खिल्लार वासरे, देशी गाय कवडीमोल किंमतीत द्यावी लागत आहेत.
Views: 23