सोलापूर : शहराच्या सांस्कृतिक वैभवात महत्त्वाचे स्थान असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिराच्या नूतनीकरणाचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून या नाट्यगृहाचे मोठे नूतनीकरण झाले नसल्याने आता त्याच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी महापौर विनायक रामकृष्ण कोंड्याल यांनी पुढाकार घेतला आहे. आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरी सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाच्या विषयांना गती देण्यासाठी महापौर कार्यालयात महापौर कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी हुतात्मा स्मृती मंदिराच्या सुधारणेसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
नाट्यगृहातील प्रेक्षकांच्या खुर्च्यांची दुरुस्ती तसेच आवश्यकतेनुसार नवीन खुर्च्या बसविण्यात येणार आहेत. याशिवाय रंगमंच आणि छताची दुरुस्ती, मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणेची सुधारणा करण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या मागील बाजूस असलेल्या कलाकारांच्या विश्रामखोल्यांची दुरुस्ती आणि रंगरंगोटीही केली जाणार आहे. या कामांमुळे नाट्यगृहातील सुविधांमध्ये सुधारणा होऊन कलाकारांसह प्रेक्षकांनाही दिलासा मिळणार आहे.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणीताई तडवळकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, उद्यान सभापती राजशेखर पाटील, आरोग्य सभापती सुनील खटके, विधी सभापती सत्यजित वाघमोडे, स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, नगर अभियंता नीलकंठ मठपती यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
—–
Views: 26