सोलापूर – रेल्वेच्या ७९व्या स्कॉट मेमोरियलच्या प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत मॉडेल क्रिकेट ॲकॅडमीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
रेल्वे मैदानावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या अटीतटीच्या उपांत्यपूर्व सामन्यात मॉडेल क्रिकेट ॲकॅडमीने विजापूर क्रिकेट क्लबचा ३ गडी राखून पराभव केला. मॉडेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. विजापूर क्रिकेट क्लबचा संपूर्ण संघ अवघ्या ८२ धावांवर बाद झाला. विजापूरकडून सुहास मालीपाटील याने सर्वाधिक ३२ धावा केल्या. आदर्श राठोड याने १४ आणि डी. सुमित याने ११ धावांचे योगदान दिले. मॉडेल ॲकॅडमीकडून धारदार गोलंदाजी करताना अक्षय हावळे ८ धावात ३ तर यश बोरामणी याने १८ धावात २ बळी घेतले. सुधनव मनुर, सत्यजित जाधव, स्वराज वाले आणि सुदेश राठोड यांनी प्रत्येकी १ बळी घेत विजापूरच्या डावाला खिंडार पाडले.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना मॉडेल क्रिकेट ॲकॅडमीची सुरुवातही डळमळीत झाली होती. विजापूरच्या सलीम बेपरी याने अवघ्या ५ धावात ३ बळी घेतले. तर अक्षय बिरादार, डी. सुमित, सुहास मालीपाटील व जगदीश यांनी प्रत्येकी १ बळी घेत सामन्यात मोठी रंगत निर्माण केली. परंतु, मॉडेल ॲकॅडमीच्या संदीप राठोडने संकटसमयी संयमी फलंदाजी करत नाबाद २७ धावांची खेळी केली. त्याला सुमित आईवळे (११) आणि सुदेश राठोड (नाबाद ७ ) यांनी मोलाची साथ दिली. अखेर १७ व्या षटकात मॉडेल क्रिकेट ॲकॅडमीने ७ गड्यांच्या मोबदल्यात ८६ धावा करत ३ गडी राखून सामना जिंकला.
उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या अक्षय हावळे याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. सचिन गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी वासुदेव दोरणाल, अंबादास तोरा, सत्यजित जाधव आणि अतुल बांदेवाडीकर उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्यांना कै. सुरेश मालप यांच्या स्मरणार्थ सुदेश मालप आणि सुनील मालप यांनी पुरस्कृत केलेली आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. सामन्यासाठी पंच म्हणून अशोक डोंबाळे व शुभम मुतुर यांनी काम पाहिले.
———
आजचा उपांत्यपूर्व सामना
सेंट्रल रेल्वे परेल मेकॅनिक इन्स्टिट्यूट विरुद्ध श्री स्वामी समर्थ क्रिकेट क्लब.




















