सोलापूर – जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात विस्ताराधिकारी पदावर कार्यरत असणारे मनोज म्हेत्रे यांचे निलंबन झाल्यानंतर दररोज नवीन नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. समाजकल्याण विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले म्हेत्रे आपल्या मूळ नियुक्तीवर करमाळा येथे कामकाजावर अनुपस्थित राहिल्याचा ठपका ठेवत गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी विस्ताराधिकारी मनोज म्हेत्रे यांना निलंबित केले आहे.
परंतु याअगोदर त्यांनी पाठवलेल्या नोटिसीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी मागविला. त्यावर मनोज म्हेत्रे यांनी सीईओ यांच्याकडे याबाबत केला आहे. सी. ई.ओ. जैन यांनी हा खुलासा मान्य केला की अमान्य अद्याप हे ठरलेले नसतानाच परस्पर बीडीओ कदम यांनी निलंबनाचा आदेश काढल्याचे आता समोर आले आहे. वास्तविक सीईओ जैन यांच्या अधिकार क्षेत्रात हे प्रकरण असतानादेखील कदम यांनी आपल्याला प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करत हे निलंबन केल्याची बाब समोर आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाच्या “झारीतील शुक्राचार्य कोण”? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, समाज कल्याण विभागात दलितवस्ती विकास निधीचे टेबल सांभाळण्यासाठी सक्षम कर्मचारी नसल्याने करमाळा पंचायत समितीकडे बदली झालेल्या विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांच्याकडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी जबाबदारी दिली. ही जबाबदारी देताना मेत्रे यांच्या अतिरिक्त पदभारासाठी प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला. पण प्रशासनाने हा प्रस्ताव मान्य केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बीडिओ अमित कदम यांनी म्हेत्रे यांना नोटिसा काढल्या.
यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी गटविकास अधिकारी कदम यांना संपर्क साधून मनोज म्हेत्रे हे समाजकल्याण विभागात काम करत असल्याची कल्पना दिली. त्यानंतर काहीकाळ शांत बसून बीडीओ कदम यांनी म्हेत्रे यांना नोटिसा पाठवण्याचे सत्र चालूच ठेवले. इतकेच काय समाज कल्याणचे हजेरी पाठवूनही नोव्हेंबर पासून त्यांचा पगार बंद केला. यावरून या वादाला तोंड फुटल्याचे चित्र दिसून येत आहे.
चौकट
कदम नेमके कोणाच्या ऐकण्यात होते
बीडीओ कदम यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगूनही ते मनोज म्हेत्रे यांच्या बाबतीत दुजाभाव दाखवीत असल्याचे दिसून आले आहे. ते नेमके कोणाच्या सांगण्यावरून या हालचाली करीत होते हे स्पष्ट झालेले नाही.
चौकट
बीडीओ कदम हेही वादग्रस्तच
बीडीओ कदम हे करमाळ्यात वादग्रस्त ठरल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यालयात ते वारंवार गैरहजर राहतात अशा तक्रारी आहेत. त्यामुळे लोकांची कामे खोळंबू लागल्याने पंचायत समितीत बरीच ओरड झाली आहे. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील असून तेथे त्यांचा खाजगी दवाखाना आहे,अशी चर्चा करमाळा तालुक्यात ऐकण्यास मिळत आहे. त्यामुळे बराच वेळा हे दवाखान्याच्या कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. मध्यंतरी त्यांनी महिनाभर रजाही काढली होती. अनेक वेळा कार्यालयाला दांडी मारणाऱ्या कदम यांच्यावर आता कारवाई कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Post Views: 10