सोलापूर : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी विणकर बाग येथे हातमागावर काम करणाऱ्या विणकराच्या प्रतीकात्मक पुतळ्यास महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हातमाग उद्योगात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विणकरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी महापौर कोंड्याल म्हणाले, सोलापूरची ओळख हातमाग उद्योग आणि विणकरांच्या कष्टाळू परंपरेमुळे देशभर निर्माण झाली आहे. सोलापुरी चादर, टॉवेल आणि अन्य हातमाग वस्त्रांनी देश-विदेशात ओळख निर्माण केली असून हा वारसा जपणे ही सामूहिक जबाबदारी आहे. विणकर समाजाने मांडलेल्या सात दिवसांच्या हातमाग प्रदर्शनाच्या तसेच कायमस्वरूपी हातमाग संग्रहालय उभारण्याच्या मागण्यांचा महापालिका प्रशासन सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाहीसाठी प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक इंदापुरे यांनी केले. सोलापूरच्या हातमाग उद्योगाचा इतिहास जतन करण्यासाठी विणकर बाग येथे दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सात दिवसांचे हातमाग प्रदर्शन आयोजित करावे, तसेच हातमाग उद्योगाचा इतिहास, पारंपरिक विणकामाची साधने, विविध वस्त्रप्रकार आणि विणकर समाजाचा वारसा जतन करण्यासाठी कायमस्वरूपी हातमाग संग्रहालय उभारावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी प्रवीण फलमारी, नागनाथ वंगा, विजय बडगु, व्यंकटेश येमूल, महेश संचू, सत्यनारायण गंगा, श्रीनिवास अनंतुल तसेच झुंजा यांचा महापौर विनायक कोंड्याल व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
सोलापूर शहर भाजपच्या वतीने राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बांधवांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ‘व्होकल फॉर लोकल’ संकल्पनेला बळ देत हातमाग उद्योगाच्या प्रगतीसाठी विणकरांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाचे मार्गदर्शक आमदार देवेंद्र कोठे असून, संयोजक नगरसेवक सीए. विनोद धर्मा भोसले व नागेश सुरेश खरात होते.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, अशोक इंदापुरे, ज्येष्ठ माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, सत्यनारायण गुर्रम, विनोद भोसले, अक्षय अंजीखाने, श्रीनिवास कोंडी, विजय चिप्पा, प्रशांत पल्ली, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, अंबादास बिगी, मंडळ अध्यक्ष नागेश सरगम, नागेश खरात, अजय दासरी, श्रीनिवास क्यातम, वासुदेव इपलपल्ली, मुरलीधर आरकाल, रमेश विडप, मल्लिकार्जुन आरकाल यांच्यासह विणकर समाजाचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महिला, युवक व नागरिक उपस्थित होते.
Post Views: 3