सोलापूर : वराह चोरल्याचा आणि त्यांना विष घालून मारल्याचा २०२० मध्ये पोलिसात दाखल केलेला खटला माघारी न घेतल्याच्या रागातून सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५ वर्ष, रा. घर नं. ८८, रफिक नगर, एमआयडीसी , भारत गॅस गोडाऊन जवळ, सोलापूर) या तरुणाचा गजबजलेल्या रस्त्यावर ५-६ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून व दगड डोक्यात घालून अमानुषपणे खून केल्याची खळबळ जनक घटना एमआयडीसी रोडवरील ७० फूट रोड येथील नीलम हॉटेल समोर आज रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. सुरेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडताच मारेकरी हे दुचाकीवरून सुसाट वेगाने फरार झाले.
आज रविवारी सकाळी मयत सुरेश हा जीमवरून घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. रविवारी सकाळी गजबजलेल्या भर रस्त्यावर आगोदरपासूनच दबा धरून बसलेल्या आरोपींनी सुरूवातीला सुरेशची दुचाकी आडवली, यामुळे तो खाली पडला. त्यानंतर त्याच्यावर सपासप वार सुरू केले. या हल्ल्यातून त्याला सावरण्याचा वेळच मिळाला नाही. त्यातच एका मारेकऱ्याने त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्यानंतर आरोपी तेथून दुचाकीवरून पसार झाले. हा प्रकार भर रस्त्यावर घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या खळबळ जनक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे पोलिसांनी आगोदर गर्दी पांगवली. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी आक्रोश व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तेथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने शासकीय रुग्णालयात शीघ्रकृती दलाचे पोलिस तैनात करण्यात आले होते. यामुळे तेथील वातावरणही तणावपूर्ण झाले होते.
चौकट –
सहा आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल
विजय अशोक श्रीराम, रोहित बसप्पा आण्णा रेडडी, करण अशोक श्रीराम, सुमित अशोक श्रीराम, राहुल बसप्पा आण्णा रेडडी(सर्व आरोपी राहणार कुंचीकोरवी गल्ली, मौलाली चौक, सोलापूर) आणि सुभाष सगडा (रा. नई जिंदगी, सोलापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत मयत सुरेश ची पत्नी लक्ष्मी सुरेश श्रीराम (वय- ३० वर्षे, रा. घर नं. ८८, रफिक नगर, एमआयडीसी भारत गॅस गोडाऊन जवळ, सोलापूर) हिने फिर्याद दिली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत हे करीत आहेत .
मृत सुरेश श्रीराम यास तीन बायका, आठ मुले…
मृत सुरेश श्रीराम याला एकूण तीन बायका असून शालिनी, लक्ष्मी, गीता असे त्यांचे नाव आहे. त्यांच्याकडून सौंदर्या, रोशनी, रुपा, गायत्री, बालाजी, महिमा, भूमिका, परशुराम असे त्या मुलांची नावे. हे सर्वजण एकत्रच राहत होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.























