सोलापूर : सात रस्ता परिसरातील नाना-नानी पार्कचा लवकरच सर्वांगीण कायापालट होणार असून ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेने नूतनीकरणाचा आराखडा तयार करण्यास गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते आणि आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोमवारी उद्यानाची संयुक्त पाहणी करून विकासकामांचा आढावा घेतला.
पाहणीवेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकुलवार, सफाई अधीक्षक अनिल चराटे आणि उद्यान प्रमुख कोमल काशीद उपस्थित होते.उद्यानात पावसाळ्यात पाणी साचत असल्याने जलनिस्सारण व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला. भविष्यात पाणी साचू नये, यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या नूतनीकरणामध्ये आकर्षक प्रवेशद्वार, सुस्थितीत वॉकिंग ट्रॅक, आधुनिक बैठक व्यवस्था, आकर्षक प्रकाशयोजना, हिरवळीचे सुशोभीकरण, वृक्षारोपण, लँडस्केपिंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विश्रांती क्षेत्र, लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जिम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच नियमित स्वच्छता व देखभाल अशा विविध सुविधांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती पाहणीदरम्यान देण्यात आली.
महापौर विनायक कोंड्याल यांनी नूतनीकरणाचा आराखडा लवकर अंतिम करून कामे दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नाना-नानी पार्क हे शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण असून, त्याचे आधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त उद्यानात रूपांतर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनी नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उद्यानाचा विकास केला जाईल. आधुनिक सुविधा, सुरक्षित वॉकिंग ट्रॅक, उत्तम प्रकाशयोजना आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक निधी व कामांना स्थायी समितीचे पूर्ण सहकार्य राहील, असे स्पष्ट केले.
नूतनीकरणात या सुविधांना प्राधान्य
आकर्षक प्रवेशद्वार
नवीन वॉकिंग ट्रॅक
आधुनिक बैठक व्यवस्था
सजावटीची प्रकाशयोजना
वृक्षारोपण व लँडस्केपिंग
ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती क्षेत्र
मुलांसाठी खेळणी
ओपन जिम
स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा
प्रभावी जलनिस्सारण व नियमित देखभाल
—-