अक्कलकोट – एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन, दानशूर शिक्षणमहर्षी कै. शिवशरण खेडगी यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त चेअरमन बसलिंगप्पा खेडगी मित्र परिवाराच्या वतीने सी. बी. खेडगी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे संचालक ॲड. अनिल मंगरुळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी कै. शिवशरण खेडगी यांच्या शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
यावेळी बसलिंगप्पा खेडगी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्यांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी ग्रामीण विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.
या स्पर्धेत मुलांचे नऊ तर मुलींचे आठ संघ सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने स्पर्धेला रंगत आली.
स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे :
पुरुष गट :
प्रथम : श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, वळसंग
द्वितीय : उडगी प्रशाला, उडगी
तृतीय : शिवचलेश्वर प्रशाला, मैंदर्गी
महिला गट :
प्रथम : छत्रपती शिवाजी हायस्कूल, सोलापूर
द्वितीय : उडगी प्रशाला, उडगी
तृतीय : जिल्हा परिषद हायस्कूल, सोरेगाव (सोलापूर)
स्पर्धेचे पंच म्हणून गोविंद चव्हाण आणि अविनाश राठोड यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अंकुश शिंदे, उपप्राचार्य व्ही. एन. वैद्य, पर्यवेक्षक एस. एन. भरमशेट्टी, समन्वयक डॉ. सी. डी. अणेकर, निलव्वाबाई खेडगी प्रशालेचे मुख्याध्यापक जयदिप साखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागप्रमुख डॉ. डी. एम. बिराजदार, प्रा. सोहेल शेख, सुधीर राठोड तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.