सोलापूर : नवरात्रोत्सव आणि विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त शहरात निघणाऱ्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी केले आहे.
महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) अन्वये हे आदेश जारी करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, दवाखान्यांची वाहने, अग्निशामक वाहने, संरक्षित व्यक्तींची वाहने आणि पोलिसांच्या परवानगीतील वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकावरून एसटी स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक), कल्पना कॉर्नर, डी.टी.एम. चौक, जुना हिरेज नाका, निराळे वस्ती आणि हॉटेल अंबेसेडरमार्गे एसटी स्थानकाकडे जावे.
जुळे सोलापूरहून शहरात येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी जुना पुणे नाका, जुना तुळजापूर नाका, जुना बोरामणी नाका आणि अशोक चौक हा मार्ग उपलब्ध असेल. जड वाहतुकीसाठी मार्केट यार्ड, जुना पुणे नाका, जुना बोरामणी नाका, शांती चौक आणि अक्कलकोट रस्ता हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहनधारकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे जाहिरनाम्यात नमूद केले आहे.
बंद राहणारी मार्ग –
डॉ. आंबेडकर उद्यान, सम्राट चौक,रमाबाई आंबेडकर नगर, मिलिंद नगर, अस्थी विहार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिकल चौक, सरस्वती चौक, चारपुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जुना एम्प्लॉयमेंट चौक आणि डॉ. आंबेडकर हायस्कूल ते बुद्ध विहार फॉरेस्ट या मार्गावर वाहतूक बंद राहील. तसेच फडकुले सभागृह ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरही वाहनांना प्रवेश बंद असेल.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग –
विजापूरकडून पुणे किंवा हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांनी नवीन विजापूर नाका, नवीन बायपास मार्ग आणि केगाव पुलाचा वापर करावा. हैदराबादकडून पुणे किंवा विजापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन हैदराबाद नाका, जुना हैदराबाद नाका, मार्केट यार्ड, जुना पुणे नाका आणि केगाव बायपास हा पर्यायी मार्ग असेल.
Post Views: 6