
सोलापूर : शहरातील मोहरम उत्सव हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून सामाजिक सलोखा, श्रद्धा आणि परंपरेचे अनोखे प्रतीक मानला जातो. यंदाही मोहरमच्या दिवसांत शहरात दिसणारे ‘नवसाचे वाघ’ हे या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरत असून, या माध्यमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत दर्शन घडत आहे.
पूर्व मंगळवार पेठेतील मीठ गल्ली परिसरातील ‘बडे मौलाली पंजा सवारी’ येथे मोहरमच्या सातव्या आणि आठव्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. येथे सर्वधर्मीय भाविकांना समान प्रवेश दिला जात असल्याने धार्मिक सौहार्दाचे एक सुंदर चित्र पाहायला मिळत आहे.
अनेक हिंदू आणि मुस्लिम कुटुंबे आपल्या लहान मुलांना वाघाच्या वेशभूषेत सजवून बडे मौलाली पिरांच्या दर्शनासाठी आणत आहेत. श्रद्धेनुसार, अपत्यप्राप्तीसाठी काही दांपत्य बडे मौलाली पंज्यासमोर नवस बोलतात. हा नवस पूर्ण झाल्यानंतर जन्मलेल्या मुलाला वाघाच्या रूपात सजवून दर्शनाला आणले जाते व त्या बालकाच्या हस्ते नैवेद्य अर्पण करून पिरांचे आभार मानले जातात.
मोहरमच्या सातव्या व आठव्या दिवशी ‘समाचार चौक’ परिसरात मुलांना वाघ सजविणारे रंगारी उपलब्ध असतात. आपल्या मुलांना वाघ बनविण्यासाठी पालकांची सकाळपासूनच येथे मोठी गर्दी दिसून येत आहे. रंगारींकडून वाघाचे रंगरूप पूर्ण झाल्यानंतर, अनेक कुटुंबे हलगीच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात आपल्या ‘नवसाच्या वाघाची’ मिरवणूक काढत आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात कमालीचे उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे ही परंपरा केवळ एका पिढीपुरती मर्यादित राहिलेली नाही. पणजोबा, आजोबा, वडील आणि आता मुलगा अशा पिढ्यान्पिढ्या आमच्या कुटुंबात नवसाचा वाघ बनण्याची परंपरा सुरू असल्याचे अनेक दांपत्यांनी अभिमानाने सांगितले. श्रद्धा आणि संस्कारांचा हा वारसा नव्या पिढीकडे तितक्याच आदराने सोपविला जात असल्याचे चित्र या मोहरम उत्सवात ठळकपणे अधोरेखित होत आहे.




















