
सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसरातील नव्याने सी.सी रस्ते तयार करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक (बाबा मिस्त्री) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शहर, जिल्हा तसेच राज्यातील विविध भागांतून हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये गरीब, होतकरू नागरिक, वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार, जेकॉब कामगार, मिल कामगार आदींचा समावेश आहे. रुग्णांना एक्स-रे, सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन तसेच इतर वैद्यकीय तपासण्यांसाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात ने-आण करावी लागते. मात्र, परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाला असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्ट्रेचरवरून नेण्यात येणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी) निधीतून नव्याने रस्ता तयार करण्यात यावा व रुग्णांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, या निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





















