बार्शी – तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये मोलाची भर घालणाऱ्या नवीन वर्गखोलीचा उद्घाटन सोहळा शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नवीन व सुसज्ज वर्गखोली उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणार असून, शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.
नवीन वर्गखोलीचे उद्घाटन श्रीमती शोभा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विलास काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पांगरी केंद्राचे केंद्रप्रमुख कालिदास पाटील, बांधकाम विभागाचे गिराम आणि पंचफुला बगाडे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर नवीन वर्गखोलीचे उद्घाटन करुन मान्यवरांनी वर्गखोलीची पाहणी केली. शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी, सुंदर आणि सुसज्ज वर्गखोली ही केवळ इमारत नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे, असे मत व्यक्त केले. नवीन वर्गखोलीमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, आनंददायी आणि पोषक शैक्षणिक वातावरण मिळेल, असा विश्वास केंद्रप्रमुख श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
गुणवंत विद्यार्थ्यांसह स्पर्धा विजेत्यांचा गौरव
कार्यक्रमादरम्यान सन २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. महिलांसाठी घेण्यात आलेल्या कला व कार्यानुभव प्रदर्शनातील विजेत्यांनाही यावेळी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
्विशेष म्हणजे, कार्यक्रमाला घरगुती स्वरूप देत पालकांनी शाळेसाठी विविध भेटवस्तू देऊन आपला सहभाग नोंदविला. त्यामुळे उद्घाटन सोहळ्याला ग्रामस्थांच्या आपुलकीची आणि शाळेविषयीच्या जिव्हाळ्याची जोड मिळाली.
्कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षिका श्रीमती पुष्पा चौधर व स्मिता नाझरे यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 8