
सोलापूर – साउथ सोलापूर आपटे ग्रुप आयोजित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात ‘निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमी रेड’ संघाने ‘ब्ल्यू’ संघाचा ९१ धावांनी पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.
दयानंद क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या स्पर्धेतील विजेता व उपविजेत्या संघांना रणजी क्रिकेट खेळाडू प्रवीण देशट्टी यांच्या हस्ते चषक देण्यात आले. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमी रेड संघाने निर्धारित ५० षटकांत ८ गडी बाद २१२ धावांचा डोंगरा उभा केला. यामध्ये सार्थक कन्ना याने ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली, तर अनुज मुंदडा याने ३० आणि रणबीर बुमरा याने २५ धावांचे योगदान दिले. अकॅडमी ब्लू संघाकडून गोलंदाजी करताना संस्कार गवळी आणि अनिश विरळी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर आदित्य चटके, गणेश पवार, आर्यन हांगे आणि ईश्वर सहारन यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
२१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमी ब्लू संघाचा डाव ३५.५ षटकांत १२१ धावांवर आटोपला. ब्लू संघाकडून यशराज टेकाळे याने सर्वाधिक ४० धावा केल्या, तर यश पवार याने १५ आणि श्रवण मैत्री याने १४ धावा केल्या. अकॅडमी रेड संघाच्या ऋग्वेद पाटील याने अचूक गोलंदाजी करत ३ बळी घेतले, तर आर्यन भुमकर आणि सार्थक कन्ना यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली.
उत्कृष्ट फलंदाजी (५७ धावा) आणि गोलंदाजी (२ बळी) करणाऱ्या सार्थक कन्ना याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.























