सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी गावनिहाय ‘मायक्रो प्लॅनिंग’ करून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर पंचायत समितीने भर दिला आहे. नागरिकांसह शाळा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी उपलब्ध निधीतून आवश्यक कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हा परिषद सदस्य डॉ. पृथ्वीराज माने यांनी दिल्या.
केंद्र शासनाच्या २०२६-२७ या वर्षासाठी पंचायत समितीस्तरीय विकास आराखडा तयार करून त्यास मंजुरी देण्यासाठी आयोजित बैठकीत डॉ. माने बोलत होते. सभापती तेजस्विनी बोराडे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चेताली मुळे, उपसभापती सुनील भोसले, सदस्य सुनीता बारसकर, ऋतुजा बंडगर, वैशाली शीलवंत, धनाजी भोसले, गटविकास अधिकारी राजाराम बोंग, विस्तार अधिकारी सोमनाथ शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन गावनिहाय नियोजन करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. तालुका क्षेत्रफळाने लहान असल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर मर्यादित निधी उपलब्ध होतो. त्यामुळे उपलब्ध निधीचा परिणामकारक वापर करून पिण्याच्या पाण्याच्या योजना, हातपंप दुरुस्ती व नव्याने बसविणे, आवश्यक पाईपलाईन तसेच इतर पाणीपुरवठा कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा, अशी सूचना करण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम शाळा व अंगणवाड्यांवर होऊ नये, यासाठी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था तपासण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मागवून त्याची अचूक माहिती तयार करावी, असे डॉ. माने यांनी सांगितले.
बैठकीत पाणीपुरवठा, कृषी, महिला व बालकल्याण आणि शिक्षण विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. गावनिहाय पाणीस्थिती, आवश्यक कामे आणि निधीची गरज याबाबत माहिती संकलित करून त्यानुसार आराखडा तयार करण्याचे ठरले. प्रस्ताव तयार करताना शासनाचे निकष, कामांची गरज आणि उपलब्ध निधी यांचा समन्वय साधून वेळेच्या मर्यादेत आराखडा अंतिम करावा, यावरही बैठकीत भर देण्यात आला.
गावनिहाय माहिती व अहवाल संकलित करून पिण्याच्या पाण्याशी संबंधित कामांना अग्रक्रम देण्यात येईल, असे गटविकास अधिकारी राजाराम बोंग व विस्तार अधिकारी सोमनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
Post Views: 4