सोलापूर : चित्रपट संपादन, दिग्दर्शन आणि सामाजिक आशयाच्या दृकश्राव्य निर्मितीच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान देणारे मोशन फिल्म स्टुडिओ, सोलापूर–पुणेचे संचालक तथा चित्रपट संपादक सचिन अशोक जगताप यांना ‘द पब्लिक एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
अहिल्यानगर येथील हॉटेल सुवर्णम प्राईड येथे ‘द पब्लिक ब्रॉडकास्ट मीडिया’ यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि समर्पित कार्याची दखल घेत जगताप यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.प्रसिद्ध उद्योजक एन. बी. धुमाळ तसेच शिक्षणतज्ज्ञ व माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘द पब्लिक ब्रॉडकास्ट मीडिया’चे सीईओ कृष्णा बेलगावकर उपस्थित होते.
जगताप यांनी सामाजिक विषयांवरील माहितीपट, जनजागृतीपर चित्रफिती आणि विविध दृकश्राव्य निर्मितींतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.