बार्शी – गावातल्या युवकांमध्ये भक्ती भावाची ज्योत प्रज्वलित करत जन्मभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार देत झालेले शिव मंदिराच्या जन्मोतराचे कार्य आजोळ असून हे शिवमंदिर जगातले पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक अतुलजी कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
श्रावणी सोमवारच्या पवित्र दिनी जन्मभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली वर्षभर गावातील पुरातन शिव मंदिराच्या जन्मोतराचे कार्य पूर्णत्वाला गेल्यानंतर अत्यंत रेखीव व नयनरम्य दगडी कोरीव शिल्पकामातून साकारलेल्या शिव मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पोलीस अधीक्षक कुलकर्णी बोलत होते. यावेळी भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नाना कदम, कृषिभूषण बाबासाहेब पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर भालेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब धस व्यासपीठावर उपस्थित होते.
पिंपळगावमध्ये पहाटेपासूनच शिव मंदिराच्या जन्मोतदार सोहळ्यामुळे गावकऱ्यांमध्ये भक्तीचे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. ओम नमः शिवायच्या गजरामध्ये मंदिराच्या परिसरात भाविकांची अपूर्व गर्दी होती. या मंदिरामध्ये शास्त्रोक्त मंत्रघोष यामध्ये हा सोहळा झाला. गावाचे पालकत्व घेतलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आगमन झाल्यानंतर गावामध्ये शिवमंदिरापर्यंत काढलेल्या दिंडीचे भक्तीभावाने स्वागत करत जन्मभूमी महिला आघाडीच्या प्रमुख सौ. मीना जगदाळे व सौ शिल्पा नानासाहेब धस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पंचारतीने औक्षण करत मंदिराची भव्य प्रतिकृती साकारलेली प्रतिमा देऊन सत्कार केला.
यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जन्मभूमी प्रतिष्ठानचे हे कार्य म्हणजे गावागावात निर्माण व्हावी अशी लोक चळवळ आहे. गावात या मंदिरामुळे धार्मिक पर्यटन वाढणार आहे. युवकांना चांगली दिशा देण्याचे काम प्रतिष्ठानने केले आहे. गावांमध्ये शांतता एकोपा व बंधू भावाचे वातावरण कायम ठेवण्याचे काम या प्रतिष्ठानने केले आहे. या कार्यामुळे गावाचा नावलौकिक राज्यात वाढला आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गावचे भूमिपुत्र भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब धस यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढत भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष नानासाहेब धस यांनी घेतला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे सचिव स्वप्नील धस यांनी केली. यावेळी जन्मभूमी ग्रामविकास आघाडीचे प्रमुख पै. सचिन धस, सेवानिवृत्त सैनिक शरद जगदाळे, दादा चिपडे, विजयसिंह पाटील, उपसरपंच अण्णासाहेब धस, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब पाटील, हनुमंत जगदाळे प्रतिष्ठानचे प्रवक्ते सुरत चंदनशिवे, मंथन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.