सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या सभेत महापालिकेच्या प्रस्तावित १,३७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मनपाचा स्वहिस्सा उभारण्यासाठी शहरातील सात रस्ता येथील बस डेपो आणि गोल्डफिंचपेठ येथील बैलगोठा मेजर शॉपिंग सेंटर येथे बीओटी प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावास एकमताने मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचे सभागृहात सदस्यांनी स्वागत केले. शाळा आणि मैदाने हे विषय सोडून इतर विकासाच्या प्रकल्पासाठी आम्ही नेहमीच सोबत राहणार असल्याची भूमिका विरोधकांनी स्पष्ट केली.
सोलापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सायंकाळी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी डायसवर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर , महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी बीओटी प्रकल्पासंदर्भात केपीएमजी कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले. सोलापूर महापालिकेच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी मनपा स्व हिस्सा निधी उपलब्ध करण्यासाठी शहरातील एकूण सात मोक्याच्या जागा या बीओटी तत्त्वावर विकसित करून त्या पोटी विकासकांकडून एक रककमी विना परतावा रक्कम व जागेपोटी वार्षिक भाडे मिळविणे हा आर्थिक दृष्ट्या सक्षम पर्याय आहे. त्यासाठी बीओटी प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. सोलापूर शहरातील उत्तर सदर बाजार येथील सात रस्ता बस डेपोची खुली जागा आणि गोल्डफिंचपेठ येथील बैलगोठा मेजर शॉपिंग सेंटर येथील जागेवर बीओटी प्रकल्प उभारण्यास चर्चेअंती एकमताने मान्यता देण्यात आली. बस डेपो येथील जागेसाठी वन टाइम प्रीमियम 60 कोटी रुपये तर गोल्डफिंचपेठ येथील जागेसाठी 20 कोटी रुपये महापालिकेला मिळू शकणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या मालमत्तेचे प्रभावी मुद्रीकरण करून निधी उभारण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला होता. जागतिक बँकेच्या सहाय्याने प्रस्तावित सुमारे १,३७८ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत महापालिकेचा सुमारे ३५० कोटी रुपयांचा स्वहिस्सा उभारणे अपेक्षित आहे. हा निधी उभारण्यासाठी महापालिकेच्या २ जागा बीओटी/मुद्रीकरणाच्या माध्यमातून विकसित करण्यास मान्यता देण्यात आली. दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक अमोल शिंदे, शिवानंद पाटील, अर्चना वडणाल,श्रीदेवी फुलारे, किसन जाधव, वैभव हत्तुरे , अनंत जाधव, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, गणेश वानकर, अक्षय अंजिखाने, रोहिणी तडवळकर यांच्यासह नगरसेवकांनी सहभाग नोंदविला. सत्ताधाऱ्यांच्या सूचनेत विरोधकांची उपसूचना मर्ज करून अखेर हा विषय एकमताने मंजूर करण्यात आला.
काँग्रेसचे नगरसेवक प्रा. नरसिंह
आसादे यांनी मांडली उपसूचना
यापूर्वी बीओटी प्रकल्पांचा महापालिकेला वाईट अनुभव आला आहे. त्यामुळे आता प्रस्तावित जागा बीओटी तत्त्वावर देताना त्याचा महापालिकेला नेमका किती फायदा होणार, याची माहिती सभागृहासमोर देण्यात यावी, अशी उपसूचना काँग्रेसचे नगरसेवक नरसिंह आसादे यांनी मांडली. गोल्डफिंचपेठ येथील प्रकल्प उभारताना तेथील गाळेधारकांना विश्वासात घ्यावे लागणार आहे तशी प्रक्रिया केली आहे का इतर पुरातत्व विभागाचे नियम यासंदर्भात ही अभ्यास केला आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला.
विकासाला कोणीही विरोध करणार नाही : नरोटे
सोलापूरच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र शाळा, शाळांची मैदाने यांसह आरक्षित जागा बीओटी तत्त्वावर देण्याचा घाट घालू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांनी मांडली. आरक्षित जागांवर बीओटी प्रकल्प राबविल्यास उद्या कोणी न्यायालयात गेले, तर हा प्रकल्पच बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाईघाईने निर्णय न घेता सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन प्रस्तावाचा सखोल आणि कायदेशीरदृष्ट्या विचार करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी नरोटे यांनी केली. आम्ही स्टंटबाजी करत नाही या प्रकल्पाविषयी अगोदरच सर्वांना विश्वासात घेऊन माहिती देणे गरजेचे होते. शासनाकडून हा प्रकल्प आला आहे. पारदर्शकता आहे. विरोधक म्हणून आम्हाला पाहू नका. शाळा आणि मैदानांचा विषय सोडला तर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सोबतच राहणार आहोत, अशी ग्वाही चेतन नरोटे यांनी यावेळी दिली. सौर ऊर्जा प्रकल्प आणि इतर खर्चातून थोडी काटकसर केल्यास यातूनही मोठी रक्कम कमी होईल अशी सूचनाही त्यांनी केली.
सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा
आजचा दिवस : रंजीता चाकोते
सोलापूर शहराच्या विकासासाठी आणि सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी बीओटी संदर्भातील घेतलेला निर्णय हा महत्वपूर्ण आहे. सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे असे सांगत महापौरांच्या निर्णयाचे स्वागत स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनी केले.
शहराचे नाव खराब होणार नाही,
याची दक्षता सर्वांनी घ्यावी : नरेंद्र काळे
बी ओ टी प्रकल्पावरून गेल्या काही दिवसापासून आरोप- प्रत्यारोप होत आहे. ते चुकीचे आहे. सोलापूर शहर विकासासाठी महत्त्वाचा हा प्रकल्प आहे. चुकीचे काम होणार नाही यावर आमचा विश्वास आहे. हा चांगला प्रकल्प आहे यामुळे येणाऱ्या विकासकांना विश्वास वाटला पाहिजे. शहराचे नाव खराब होऊ नये याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. चांगले वातावरण राहिले तर विकास निश्चितच होणार आहे. दोन जागा विकसित करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. यात छुपा अजेंडा कोणताही नाही. कन्सल्टिंग फी ही शासन देणार आहे. शासनाकडे याचा प्रस्ताव पाठविल्यानंतर नगर विकास विभागाच्या मान्यता नंतरच हा प्रकल्प पुढे मार्गस्थ होणार असल्याचे सभागृहनेते नरेंद्र काळे यांनी सांगितले.
विकासासाठी महापौरांचा स्पीड फास्ट : अनंत जाधव
महापौर विनायक कोंड्याल यांचा विकासासाठी निर्णय घेण्याचा स्पीड फास्ट आहे. ही कौतुकास्पद आणि अभिमानाची गोष्ट आहे. असे अनेक प्रोजेक्ट आपण आणावेत. यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. शहराच्या विकासासाठी असे प्रकल्प गरजेचे आहेत. आपण निर्णय घ्यावेत असे सांगत या निर्णयाचे स्वागत भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी केले.
Post Views: 12