अकलूज – दि. ०७ रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र माळीनगर अंतर्गत संग्रामनगर आरोग्य उपकेंद्र येथे विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, अकलूज येथील विद्यार्थ्यांनी भेट दिली.
उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी तसेच आहाराविषयी माहिती देऊन उपकेंद्रातील कामकाज, उपकेंद्रातील योजना सेवा आणि सुविधा याबद्दल माहिती दिली,
तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कशा प्रकारे दिल्या जातात याची सविस्तर माहिती दिली. यामध्ये माता-बाल संगोपन, लसीकरण, कुपोषण प्रतिबंध, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, तसेच विविध शासकीय आरोग्य योजना यांचा समावेश होता.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सायली चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व, योग्य जीवनशैली, स्वच्छता व वैयक्तिक आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आढळणाऱ्या समस्येबाबत जनजागृती करून त्यावरील उपाययोजना समजावून सांगण्यात आल्या.
यावेळी विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. तसेच योग्य वैद्यकीय सल्ला देण्यात आला. .
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. आरोग्यविषयक प्रत्यक्ष माहिती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता व जागरूकता वाढल्याचे दिसून आले.
यावेळी संग्रामनगर आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सायली चंदनशिवे, आरोग्य सेविका विश्रांती पाटील, आरोग्य सेविका मनिषा अडगळे कॉलेजच्या प्राध्यापिका सुरेखा कसाब मॅडम आदी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपकेंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.




















