सोलापूर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबईच्या वतीने अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ या उपक्रमांतर्गत सलग तिसऱ्या वर्षी खुल्या राज्यस्तरीय ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सोलापूर शहरासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील केंद्रांवर पार पडणार असून, राज्यातील सर्व नवोदित व अनुभवी कलावंत, महाविद्यालये आणि नाट्यसंस्थांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.
ही राज्यस्तरीय स्पर्धा प्राथमिक, विभागीय आणि अंतिम अशा तीन टप्प्यांत पार पडणार आहे. प्राथमिक फेरी सप्टेंबरच्या अखेरीस सोलापूरसह महाराष्ट्रातील प्रमुख केंद्रांवर होईल, तर निवडक कलाकृतींची विभागीय फेरी झाल्यानंतर अंतिम फेरी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा-माहीम येथे रंगेल. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मार्गदर्शनाखाली विशेष नाट्य कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या महोत्सवात एकांकिका स्पर्धेसोबतच १००व्या नाट्यसंमेलनानिमित्त एकपात्री, नाट्यअभिवाचन आणि नाट्यसंगीत पदगायन स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. अंतिम फेरीतील विजेत्या एकांकिकांसाठी १ लाख, ७५ हजार आणि ५० हजार रुपयांची प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके असून दोन २५ हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय लेखन, दिग्दर्शन, स्त्री-पुरुष अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा व वेशभूषा यांसाठीही आकर्षक वैयक्तिक रोख पारितोषिके व सर्व सहभागींना प्रमाणपत्रे दिली जातील.
स्पर्धेची प्रवेश फी १,००० रुपये असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २०२६ आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने नाट्य परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गतवर्षी या महोत्सवात २५८ एकांकिका सादर झाल्या होत्या आणि प्रथम क्रमांकाच्या ‘पिंचिंग परफेक्ट बिघडल्यात’ या एकांकिकेचे व्यावसायिक नाटकात रूपांतर होऊन तिचे १०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. नवोदित कलाकारांना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
——————————————-
Post Views: 20