बार्शी – डॉ. बी. सी. रॉय ट्रॉफी (टियर-१) ज्युनियर बॉईज नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र राज्य (विफा) ज्युनियर बॉईज फुटबॉल संघात बार्शीच्या विश्वेश गणेश देशपांडे याची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून निवड झालेल्या १८ खेळाडूंमध्ये सोलापूर जिल्ह्यातून विश्वेश हा एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याच्या या निवडीमुळे ग्रामीण भागातील कष्टाळू आणि मेहनती खेळाडू राष्ट्रीय स्तरावर बार्शीची छाप उमटवत आहे.
पश्चिम भारत फुटबॉल संघटनेतर्फे महाराष्ट्राच्या ज्युनियर बॉईज संघाच्या (विफा) तयारीसाठी १३ ऑगस्टपासून मुंबईतील कूपरेज फुटबॉल मैदानावर प्रशिक्षण शिबीर व निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी विश्वेशची सुरुवातीला निवड करण्यात आली होती. शिबिरातील उत्कृष्ट कामगिरी आणि प्रभावी खेळाच्या जोरावर त्याची महाराष्ट्राच्या अंतिम संघात निवड झाली आहे.
तत्पूर्वी शिरपूर, धुळे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर मुलांच्या आंतर-जिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारे विश्वेशची महाराष्ट्राच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली होती. त्यानंतर मुंबईतील शिबिरात आपल्या खेळाची छाप पाडत त्याने अंतिम संघातील स्थान निश्चित केले.
महाराष्ट्राचा संघ सध्या २५ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान बंगळूर, कर्नाटक येथे सुरु असलेल्या डॉ. बी. सी. रॉय ट्रॉफी (टियर-१) राष्ट्रीय ज्युनियर बॉईज फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत विश्वेश महाराष्ट्राच्या संघात सहभागी असून, बार्शीसह सोलापूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब आहे.
विश्वेश सध्या संजीवन स्कूल, पन्हाळा येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. त्याला संचालक सौरभ भोसले तसेच प्रशिक्षक अमित साळोखे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिक्षणासोबतच फुटबॉलच्या मैदानावर सातत्यपूर्ण मेहनत आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विश्वेशने महाराष्ट्राच्या संघापर्यंत मजल मारली आहे.
विश्वेशच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल बार्शी व सोलापूर जिल्ह्यातील फुटबॉलप्रेमी, क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.
Post Views: 15