सोलापूर : महापालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेपैकी एक हप्ता शिक्षक दिनापूर्वी देण्यात येणार असल्याचे आश्वासन महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.
मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या निवेदनानंतर निर्णय घेण्यात आला आहे.
सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम शासन नियमानुसार पाच समान हप्त्यांमध्ये देणे अपेक्षित आहे. त्यापैकी महापालिकेकडून आतापर्यंत पहिला व दुसरा हप्ता अदा करण्यात आला असून तिसरा, चौथा व पाचवा हप्ता अद्याप प्रलंबित आहे. शासनाकडून सर्व पाचही हप्त्यांची रक्कम प्राप्त झाल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, शाखा सोलापूर महानगरपालिका यांच्या शिष्टमंडळाने महापौर विनायक कोंड्याल यांची भेट घेऊन थकीत हप्ते तातडीने देण्याची मागणी केली. यावेळी महापौरांनी महापालिकेचे मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक घेतली.
या बैठकीत शिक्षक दिनापूर्वी प्रलंबित हप्त्यांपैकी एक हप्ता देण्याचे महापौरांनी मान्य केले. त्यामुळे महापालिका शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.बैठकीस सभागृह नेते नरेंद्र काळे, मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर उपस्थित होते. संघटनेच्या शिष्टमंडळात अध्यक्ष नागेश गोसावी, कोषाध्यक्ष संदीप घोळवे, संघटक राहुल पाटील, प्रसन्न निकंबे, उर्दू टीचर्स फेडरेशनचे अध्यक्ष फजल शेख, उपाध्यक्ष इमरान पठाण आदींचा समावेश होता.
Post Views: 7