सोलापूर – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याला ३ हजार ७०० रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. बाजारात २९२ ट्रकमधून सुमारे २९ हजार ४५२ क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. सरासरी भाव प्रतिक्विंटल १७०० रुपये तर निचांक दर २०० रुपये मिळाला.
अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १४ हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. पावसाळ्यात काही दिवस शेतातून पाणी वाहिल्याने कांदा जागेवरच खराब झाला. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बाजार समितीत येणारा कांदा ६० टक्के खराबच होता. त्यामुळे पांढऱ्या कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला खूपच कमी भाव मिळत होता. सरासरी भाव ७०० रुपयांपर्यंत होता, पण आता दोन दिवसांपासून १६०० ते १७०० रुपयांचा भाव स्थिर आहे.
दरम्यान, निर्यातीच्या निर्बंधामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या भावात अपेक्षित सुधारणा झालेली नाही. भाववाढीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत जपून ठेवला. पण, अपेक्षित भाव मिळाला नाही. खरीप कांद्याच्या काढणी हंगामाला सुरुवात झाल्यानंतरही सुरुवातीला चांगला दर मिळाला नाही. मात्र, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात काहीअंशी सुधारणा झाली आहे.
चौकट
पूर्णपणे वाळलेल्या कांद्याला चांगला भाव
पक्व आणि पूर्णपणे सुकलेल्या कांद्यालाच चांगले मार्केट आहे. अर्धपक्व तथा ओला कांदा वाळलेल्या चांगल्या कांद्याच्या निम्म्या किंमतीने विकला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, सांगोला या तालुक्यातून कांद्याची सर्वाधिक आवक आहे. याशिवाय पुणे, अहिल्यानगर, बीडसह कर्नाटकातूनही सोलापुरात कांदा विक्रीसाठी येत आहे.
चौकट
निर्यातीवरील काहीअंशी निर्बंध शिथिल झाल्याने कांद्याच्या दरात सुधारणा
सोलापूर बाजार समितीत कांदा खरेदीसाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगण या राज्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. येथील कांद्याला बांग्लादेश, श्रीलंकेत मोठी मागणी आहे. निर्यातीवरील काहीअंशी निर्बंध शिथिल झाल्याने कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याचे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. फेब्रुवारीपर्यंत कांद्याचे सध्याच्या तुलनेत भाव वाढलेलेच असतील, असेही ते म्हणाले.
चौकट
तीन दिवसातील कांद्याची आवक
एकूण गाड्या
६९२
एकूण क्विंटल
७०,४५२
किमान-कमाल सरासरी भाव
१७०० ते ३७०० रुपये
सरासरी १७०० रुपये


















