सोलापूर – अज्ञात कारणावरून एका 21 वर्षीय एकुलत्या मुलाने राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली .
संकेत राजेंद्र जाधव उर्फ ढेकळे (वय 21 वर्ष रा.कारंडेनगर बेलाटी, ता.उत्तर सोलापूर) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे . तो अविवाहित असून मजुरी करायचा . शनिवारी त्याचे आई-वडील हे कामानिमित्त बाहेर जाऊन संध्याकाळी आठ वाजता घरी परतले. तेव्हा घराचे दार आतून बंद होते. त्यांनी बराच वेळ आवाज दिला मात्र आतून काहीच उत्तर मिळत नसल्याने शंका आल्याने त्यांनी शेजारच्या घरातून त्यांच्या घरात प्रवेश केला . तेव्हा संकेत याने घरातील छताला गळफास घेतला असल्याचे त्यांच्या निदर्शनास पडले. त्यानंतर त्यांनी इतरांच्या साह्याने संकेत यास फासातून सोडवून खाली उतरविले. ही खबर सलगर वस्ती पोलिसांना समजली असता पोलीस हवालदार एस एस पांढरे यांनी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात रात्री पावणे नऊ वाजता दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले . मयत संकेत च्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .
Post Views: 5