अक्कलकोट – ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष काशिनाथ कुंभारे व कार्याध्यक्ष शरणप्पा कुंभार यांनी दिली.
यात्रा महोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी आठ वाजता चतुर्दशी निमित्ताने श्री देवीची मंदिरापासून ते श्री शांतलिंगेश्वर हिरेमठ पर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी विहीरीवर श्री देवीची जलाभिषेक, ओटी भरणे व वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांच्या विविध मंत्रोच्चारात विधीवत पूजा व आरती होणार आहे. त्यानंतर सुहासिनी महिलांचा पूजन करून प्रसाद वाटप होणार आहे.
यात्रा महोत्सवाच्या मुख्य दिवशी शनिवारी (दि.१६) अमावस्या निमित्ताने श्री देवीची आरती, रुद्राभिषेक व पूजा होणार आहे. त्यानंतर मंदिर भाविकांना नैवेद्य दाखविण्यासाठी व दर्शनासाठी खुला राहणार आहे. सकाळी दहा वाजता श्री देवीची मिरवणूक शुभारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, नगरसेवक व अन्य मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या दिवशी कुंभार गल्ली पासून ते टिळक गल्ली, मेन रोड, हरवाळकर गल्ली, कारंजा चौक, श्री स्वामी समर्थ समाधी मठ, बसस्थानक, वेताळ चौक, खासबाग गल्ली, हन्नूर चौक, धनगर गल्ली, बेडर गल्ली मार्गे निघणार आहे.
दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१७) सकाळी दहा वाजता श्री देवीची सवाद्य मिरवणूक मंदिरापासून ते नाईकवाडी गल्ली, फत्तेसिंह चौक, भारत गल्ली, मधला मारुती, सुभाष गल्ली, आझाद हिंद गल्ली, माळी गल्ली, देशमुख गल्ली, महादेव नगर मार्गे निघणार आहे.
या यात्रा उत्सवात पारंपरिक वाद्य, वाजंत्री, डिजिटल फटाके, ढोल, ताशा, टाळ चा समूह सहभागी होणार आहे.
मंगळवारी (दि. 19) कुंभार मठात सकाळी अकरा ते दुपारी चार वाजता सर्व भाविकांना खिरीचा महाप्रसाद वाटप होणार आहे. तरी सर्व भाविकांनी यात्रा उत्सवात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हान श्री चौडेश्वरी देवी मंदिर यात्रा महोत्सव कमिटीने केले आहे.
“श्री चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सव हा अक्कलकोटच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. या उत्सवात सर्व भाविकांनी सहभागी होऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा.”
* काशिनाथ कुंभारे, अध्यक्ष, श्री चौडेश्वरी देवी मंदिर ट्रस्ट
“यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उत्सवाची शोभा वाढवावी.”
* शरणप्पा कुंभार, कार्याध्यक्ष,
यात्रा महोत्सव समिती


























