पंढरपूर – “जिद्द आणि चिकाटी असेल तर ग्रामीण भागातील महिला कोणत्याही संकटावर मात करून यशाचे शिखर गाठू शकतात,” हे पंढरपूर तालुक्यातील खेडभाळवणी येथील मिनाक्षी मारुती साळुंखे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. कधीकाळी अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस काढणाऱ्या मिनाक्षीताईंनी बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचे चार यशस्वी उद्योग उभे केले असून, आज त्या जिल्ह्याभरातील महिलांसाठी एक दीपस्तंभ बनल्या आहेत.
मिनाक्षी साळुंखे यांच्या या संघर्षाची खरी सुरुवात २०१८ मध्ये झाली. गावात सुरू झालेल्या बचत गट योजनेची माहिती मिळताच त्यांनी पुढाकार घेऊन १० महिलांना एकत्र केले आणि ‘क्रांती स्वयंसहाय्यता समूह’ स्थापन केला. केवळ गट स्थापन करून न थांबता, त्यांनी स्वतः धाडस दाखवले आणि गटाच्या माध्यमातून पहिले कर्ज काढून ‘मिरची कांडप’चा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नाचा योग्य विनियोग करत त्यांनी एकामागून एक व्यवसायांचे जाळे विणले.
एकाच वेळी चार यशस्वी उद्योग
आज मिनाक्षीताई एक-दोन नव्हे, तर तब्बल चार उद्योग एकटीच्या जोरावर समर्थपणे सांभाळत आहेत:
शुद्ध जल प्रकल्प (वॉटर फिल्टर): गावाला स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवण्यासाठी त्यांनी हा प्रकल्प उभारला.
मिरची कांडप उद्योग: दर्जेदार मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेला हा त्यांचा मूळ व्यवसाय.
डिकोडा मशीन: शेतीपूरक कामांसाठी लागणारे आधुनिक यंत्र.
कापड दुकान: ग्रामीण महिलांच्या गरजा ओळखून सुरू केलेले कपड्यांचे दालन.
‘एकता महिला मंच’च्या माध्यमातून समाजकार्य
मिनाक्षीताई केवळ स्वतःच्या प्रगतीवर थांबल्या नाहीत, तर खेडभाळवणी परिसरातील इतर महिलांनाही संघटित करण्याचे काम त्या करत आहेत. ‘एकता महिला मंच’ हे महिलांच्या न्याय-हक्कासाठी एक हक्काचे व्यासपीठ असल्याचे त्या मानतात. या मंचाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून महिलांचे संघटन करण्यावर त्यांचा भर आहे. “एकता महिला मंचाच्या पाठबळामुळे ग्रामीण महिला नक्कीच विकासाची उंच भरारी घेतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मिनाक्षीताईंनी आपल्या व्यवसायासोबतच पतीला संसारात खंबीर साथ दिली आहे. मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली असून, आज त्यांचे कुटुंब पूर्णपणे स्थिरावले आहे. त्यांच्या या प्रवासात बचत गटाचे आणि त्यांचे कुटुंब आणि ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले. रडत न बसता परिस्थितीला धैर्याने भिडणारी एक सक्षम स्त्री म्हणून आज पंढरपूर तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.
“बचत गट आणि एकता महिला मंचामुळे मला एक नवी ओळख मिळाली. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या हक्कासाठी लढायला हवे. आमच्या पाठीशी आता ‘एकता’चे मोठे पाठबळ असल्याने आम्ही नक्कीच मोठी झेप घेऊ.”
— मिनाक्षी मारुती साळुंखे (महिला उद्योजिका, खेडभाळवणी)



























