सोलापूर – जिल्ह्यातील ग्रामसेवकांचा गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेला कालबद्ध पदोन्नतीचा प्रश्न सप्टेंबरअखेर मार्गी लावण्याची प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली असून, संबंधित ग्रामसेवकांचे गोपनीय अहवाल तातडीने मागविण्यात आले आहेत. येत्या आठ दिवसांत हे अहवाल सादर करण्याच्या सूचना पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिली.
ग्रामसेवकांना सेवा कालावधीची १०, २० आणि ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार कालबद्ध पदोन्नतीचा लाभ दिला जातो. मात्र, त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल आवश्यक असल्याने ही प्रक्रिया काही प्रमाणात रखडली होती. आता प्रशासनाने याबाबत हालचाली गतिमान केल्या आहेत.
गोपनीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक छाननी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कालबद्ध पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामसेवकांच्या कार्याची दखल घेण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा ठरणार आहे. कालबद्ध पदोन्नतीचा प्रलंबित प्रश्न आणि प्रोत्साहनात्मक पुरस्कारांची प्रक्रिया एकाच वेळी पुढे सरकल्याने ग्रामसेवकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ उपस्थित होते.
कोट
“ग्रामसेवकांची कालबद्ध पदोन्नतीची प्रक्रिया सप्टेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक गोपनीय अहवाल आठ दिवसांत प्राप्त करून पुढील प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्यात येईल.”
— सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग
चौकट
तीन वर्षांचे ३३ आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
दरम्यान, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांसाठीचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी ११ पुरस्कार याप्रमाणे एकूण ३३ आदर्श ग्रामसेवकांचा गौरव करण्यात येणार आहे.