दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँक यांच्या वतीने ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता अभियंता भवन, शेगाव नाका, अमरावती येथे राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा २०२६ निमित्य दृष्टी ते दूरदृष्टी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती जिल्हा मधील एकमेव धर्मदाय नेत्रपेढी दिशा इंटरनॅशनल आय बँक द्वारे या कार्यक्रमात नेत्रदान करणाऱ्या दिवंगत दात्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार असून, त्यांच्या निःस्वार्थ योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच समाजात नेत्रदानाबाबत जनजागृती आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा संदेश दिला जाणार आहे.
कार्यक्रमात श्री. प्रद्युम्न इंगळे, कंट्री प्रेसिडेंट व ग्लोबल हेड, हेनकेल (Henkel) आणि श्री. अमित वायकर, प्रेसिडेंट व सेल्स लीडर, आशिया, मोमेंटिव्ह (Momentive) सहभागी होणार आहेत. श्री अमित वाईकर यांना परदेशी भारतीयाला देण्यात येणारा सर्वोच पुरस्कार म्हणजे प्रवासी प्रवासी भारतीय सन्मान भारताचे मा. राष्ट्रपती यांच्या द्वारे देण्यात आलेला आहे. या दोन्ही पाहुण्यांची मुलाखत घेण्याकरिता मित्रम्हणे पॉडकास्टचे संस्थापक श्री. सौमित्र पोटे अमरावतीला येणार आहेत.
या संवादातून उपस्थितांना करिअर, नेतृत्व, संवादकौशल्य, जागतिक संधी, व्यावसायिक विकास आणि जीवनातील अनुभव याबाबत प्रेरणादायी विचार व मार्गदर्शन मिळणार आहे.





















