बार्शी – महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ तसेच विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी दि. १४ मे २०२६ पासून राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती देणारे निवेदन श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीचे प्राचार्य डॉ. शेख यांना सादर करण्यात आले.
सेवक संयुक्त कृती समिती व महासंघाच्या निर्देशानुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यामध्ये सुरुवातीला दि. १४ ते १६ मे दरम्यान राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे.
त्यानंतर दि. १८ ते २० मे या कालावधीत दुपारच्या सुट्टीमध्ये धरणे आंदोलन, निषेध सभा आणि घोषणाबाजी करण्यात येणार आहे. तसेच दि. २५ मे रोजी राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार असून दि. २९ मे रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शासनाने यानंतरही सकारात्मक निर्णय न घेतल्यास दि. १ जून २०२६ रोजी अत्यावश्यक सेवा वगळता एकदिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रलंबित प्रश्न निकाली न निघाल्यास दि. ८ जून २०२६ पासून बेमुदत कामबंद व संप आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थी तसेच विद्यापीठ व महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज विस्कळीत होऊ नये यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे सोलापूर जिल्हा सचिव भीमराव मस्के, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शरद मस्के तसेच महाविद्यालयीन कर्मचारी संतोष कवडे, संदिपान पिंगुरे, श्रीमती मोळवणे एस. एस., दिनेश स्वामी, सचिन मोरे, शहाजी महाडिक, आनंद देशमुख, शिवाजी हाके, रामराजे सूर्यवंशी, दीपक शिर्के, विक्रम काकडे उपस्थित होते.

























