बार्शी – येथे राहणाऱ्या सहा महिन्यांच्या गर्भवती विवाहित असलेल्या पूनम विकी पाटोळे यांनी पती विकी दत्तू पाटोळे, सासू नंदा दत्तू पाटोळे, सासरे दत्तू पाटोळे, नणंद संध्या सागर लोखंडे, नणंदेचे पती सागर सुरेश लोखंडे (रा. दौंड, जि. पुणे) तसेच करमाळा येथील सोनाली आलाट यांच्याविरोधात हुंड्याची मागणी, शारीरिक व मानसिक छळ, मारहाण, धमक्या आणि कथित अनैतिक संबंधांमुळे त्रास दिल्याची फिर्याद बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
फिर्यादी पूनम विकी पाटोळे (वय २९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह ४ मे २०१६ रोजी बार्शी येथे समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे झाला. विवाहानंतर सुरुवातीला काही काळ चांगला संसार झाला. मात्र त्यानंतर पती व सासरच्या मंडळींकडून नोकरीसाठी पैसे भरायचे असल्याचे कारण सांगत माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. नकार दिल्यानंतर शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ सुरु झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या आई-वडिलांनी संसार टिकावा या उद्देशाने दोन लाख रुपये दिल्यानंतरही घर बांधण्यासाठी आणखी पांच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच पुन्हा तीन लाख रुपये रोख स्वरुपात दिल्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दरम्यान, पतीचे करमाळा येथील एका महिला कर्मचाऱ्याशी कथित अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याबाबत जाब विचारला असता पतीने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकाराची माहिती सासरच्या मंडळींना दिल्यानंतर त्यांनीही मला पाठिंबा न देता उलट शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिलेलाही या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर तिने घरी येऊन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारामुळे त्रस्त होऊन १६ मार्च २०२६ रोजी त्या दोन मुलींना घेऊन माहेरी गेल्या. त्यानंतर भरोसा सेल, सोलापूर येथे तक्रार दिली होती. मात्र तेथेही पतीने पत्नीला नांदविण्यास व मुलांचा सांभाळ करण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच फिर्यादीच्या पोटातील बाळ आपले नसल्याचेही पतीने सांगितल्यांचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पती, सासू, सासरे, नणंद, नणंदेचा पती आणि पतीच्या कथित प्रेयसीविरुद्ध हुंड्याची मागणी, शारीरिक व मानसिक छळ, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि कौटुंबिक अत्याचार केल्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 11